जळगावचे मेडिकल हब आता दृष्टीपथात

0

लोकशाही संपादकीय लेख

२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीत भाजप सेना युतीच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रत्येक जिल्ह्यासाठी एक शासकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. या पाच वर्षाच्या काळात कालावधीत आताचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असलेले गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाते होते. त्यावेळी एप्रिल २०१७ मध्ये जेव्हा जळगावच्या शासकीय महाविद्यालयाची घोषणा झाली, तेव्हा जळगाव येथे एकाच ठिकाणी वैद्यकीय शास्त्राच्या सर्व शाखांचे शिक्षण देणाऱ्या वैद्यकीय संकुलाची घोषणा झाली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे. तथापि गेली पाच-सहा वर्षे जळगावच्या मेडिकल हबचे कार्य अत्यंत संथ गतीने चालले होते. मध्यंतरी दोन अडीच वर्ष कोरोनाच्या संसर्गामुळे त्याचे काम थंड बस्त्यात पडून होते. अडीच वर्षे सत्ता बदलामुळेही त्याला खीळ बसली. दरम्यान जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयात सुरू आहे. सुरुवातीला ७५ आणि आता १०० जागांसाठी प्रवेश असलेले हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांअभावी सुरू आहे. जळगाव पासून जवळ असलेल्या जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील चिंचोली शिवारात सुमारे ७५ एकर जागेत हे वैद्यकीय संकुल उभे राहणार असून, ही जागा या मेडिकल हबसाठी अधिकृत करण्यात आली आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, दंतचिकित्सा महाविद्यालय, फिजीओथेरपी विभाग आणि महाराष्ट्रातील पहिले होमिओपॅथी महाविद्यालयाची उभारणी केली जाणार असून हे महाराष्ट्रातील पहिले मेडिकल हब असणार आहे. सर्व पॅथीचे महाविद्यालय, सर्व सुख सुविधांनी युक्त अशी सुसज्ज महाविद्यालय असतील. याच परिसरात स्टाफ कॉर्टर्स, लेडीज आणि जेंट्स हॉस्टेल, विद्यार्थ्यांच्या क्षमते एवढे बांधण्यात येणार आहे. त्यासाठी यंदा ७०० कोटी रुपयांचे अनुदान मिळाले असून सर्व बांधकामाच्या निविदा मंजूर होऊन त्याचे कार्यादेशही निघाले आहेत. मेडिकल हब साठी ७०० कोटी रुपये कमी पडू नये, म्हणून एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून ५००० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले असून हे इतर ठिकाणच्या मेडिकल महाविद्यालयाच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे, हे विशेष. आता मेडिकल संकुलाच्या बांधकामासाठी जेवढा कालावधी लागेल तेवढ्या कालावधीत जळगावचे सुसज्ज असे मेडिकल महाविद्यालय उभारले जाईल हे मात्र निश्चित.

जळगावच्या मेडिकल हबमुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती निर्माण होणार आहे. या मेडिकल संकुलातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, आयुर्वेद महाविद्यालयात १०० विद्यार्थी, दंत महाविद्यालयासाठी ५० विद्यार्थी, होमिओपॅथी विभागात ५० विद्यार्थी आणि फिजिओथेरपी महाविद्यालयात ४० विद्यार्थ्यांना म्हणजे एकूण ३४० विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळणार आहे. या प्रथम वर्षाच्या ३४० विद्यार्थ्यांना या संयुक्त संकुलात उभारलेल्या हॉस्टेलमध्ये प्रवेश राहील. त्यानंतर पदवी होईपर्यंत एकूण १००० विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था राहील. त्याच प्रमाणे टिचिंग, नॉन टीचिंग स्टाफचे कॉर्टरमध्ये राहणाऱ्यांची संख्या तसेच महाविद्यालयाच्या सर्व पॅथीच्या उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जळगावचे हे मेडिकल संकुल दररोज गजबजलेले असेल. या मेडिकल संकुलामुळे अनेकांना व्यवसाय मिळणार असल्याने जळगाव औरंगाबाद महामार्गावरील या मेडिकल हबने आकर्षण प्राप्त होणार आहे. जळगाव शहर आणि विकास जिल्ह्याच्या अर्थकारणासाठीही त्याचा फायदा होणार आहे. उपचारा अभावी कोणत्याही रुग्ण दगावणार नाही, अशी व्यवस्था मेडिकल हब मुळे होणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाते असताना आता या मेडिकल हबला चालना मिळेल, यात शंका असण्याचे कारण नाही. कारण गिरीश महाजन हे मंत्री नसताना साधे आमदार असल्या पासून गोरगरिबांना मोफत औषधोपचार करण्याची सुविधा करत आहेत. सुरुवातीला जामनेर तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्याची व्यवस्था ते करायचे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात कोणत्याही गरजू गरीब रुग्णांना मुंबईमध्ये मोफत उपचाराची व्यवस्था ते करायचे. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र सेलच उभा केला आहे. त्यानंतर २०१४ पासून ते मंत्री झाल्यापासून याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. डोळ्यांवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी डोळ्यांचे सुप्रसिद्ध डॉक्टर तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) त्यांना जिल्ह्यात पाचरण करून भव्य असे शिबिर घेऊन शेकडो रुग्णांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून घेतले. त्यामुळे गिरीश महाजन लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे राजकारण काही असो पण गोरगरीब जनतेचा मसीहा म्हणून त्यांना संबोधले जाते. यात सहभागी लाभार्थी रुग्ण कोणत्या जातीचा, धर्माचा किंवा कोणत्या राजकीय पक्षाचा आहे, हे निकष कधीच लावले जात नाहीत. म्हणून गोरगरीब रुग्ण गिरीश महाजन यांना देवदूत म्हणतात. जळगावचे वैद्यकीय संकुल ही त्यांचीच देण म्हणून ओळखले जाईल, एवढे मात्र निश्चित…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here