जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑपरेशन सिंदूरनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर देशभरात निघणाऱ्या तिरंगा यात्रांवर आणि साजऱ्या होणाऱ्या जल्लोषावर नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, आपण युद्ध जिंकलं नाही, केवळ युद्धविराम झाला आहे. त्यामुळे साजरा होणारा हा जल्लोष खूपच वेदनादायक वाटतो, अशी खंत अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आता यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी अमित ठाकरे यांना टोला लगावला आहे.
हा तर बालिशपणा
गिरीश महाजन म्हणाले की, संपूर्ण देशाने आणि जगाने बघितले आहे की, आपण काय केलं आहे. तुम्हाला त्याबाबतही काही शंका आहे का? हे लोक प्रसिद्धीसाठी का असे पत्र लिहितात? हे मला काही कळत नाही. पत्र लिहिण्याची काही आवश्यकता नाही. सगळ्या जगाने पाहिले आहे की, आमच्या सैन्याने काय केले आहे. तुम्हाला आता रिझल्ट पाहिजे, उत्तर पत्रिका पाहिजे, हा सगळा बालिशपणा सुरु आहे, असा टोला त्यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.
खडसेंना मीच दिसतो
जळगावमधील ड्रग्स प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणातील संशयित अब्रारर कुरेशी हा पसार आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे संशयिताच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. यानंतर दत्तात्रय पोटे याला निलंबित करण्यात आले. यानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी सत्ताधाऱ्यांमधील एक स्वीय सहायक काम करत असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्याबद्दल आता मी काय बोलू. कुठेही काही झालं तरी त्यांना आता मीच दिसतो. पोलीस अधिकारी पोटे आरोपीसोबत फोनवर वारंवार बोलत होते. त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई झाली आहे. मग कशासाठी आपण फालतू बडबड करायची? हे काय मला कळत नाही, असे त्यांनी म्हटले.

