..तर आमच्या सर्वोकृष्ट पुरणपोळी मोदकला का नाही – जयंती कठाळे

0

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात महिला सन्मान सप्ताहाचा समारोप

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

त्यासाठीच्या कष्टाचेही योग्य नियोजन करा आणि जे कराल ते सौजन्यानेच करा… कारण सौजन्याच्या मागेच लक्ष्मी असते… असा मूलमंत्र आज प्रसिद्ध उद्योजिका जयंती कठाळे यांनी दिला. दीड तासाच्या या निखळ संवादात त्यांनी आपली रोखठोक मते व्यक्त करताना खणखणीत आत्मविश्‍वास कसा असतो, याची प्रचितीही दिली. निमित्त होते, जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात “जागतिक महिला दिन’ अंतर्गत सुरु असलेल्या महिला सन्मान सप्ताहाच्या संवादमालिकेचे. या मालिकेतील आज सांगतेचे पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, सॉफ्ट स्कील ट्रेनर तसेच प्रसिध्द साइकोलॉजिस्ट रम्या राजकुमार, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, महिलांनो जागे व्हा. कुटुंब संस्था, जातीच्या व धर्माच्या नावाखाली मुळीच जीवन जगू नका. स्वत:च कर्तृत्व दाखवा. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी आजची स्त्री प्रयत्नशील आहे. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत महिला जवळपास सर्वच क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत.आज महिलांना करण्यासारख्या अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. अंगावर काही तोळे दागिने घालून शोभेची वस्तू होण्यापेक्षा, स्वत:च्या हिमतीवर कमवणारी उद्योगिनी व्हा. गृहिणींनी स्वत:चा वेळ, बुद्धीचा वापर करावा, उद्योग व्यवसायात उतरावे व फक्त गृहिणी न राहता गृहलक्ष्मी बनावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त. तसेच यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या जयंती कटाळे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, मी ‘आयटी’मध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि जबाबदारीची पदं भूषवीत होते. मात्र, परदेशातील दौऱ्यावर असताना चायनीज, इटालियन असे पदार्थ खाताना मला आपल्या अस्सल मराठमोळ्या मातीतील पदार्थ त्याहीपेक्षा अधिक चवीचे जाणवले व ते जगभर पोचले पाहिजेत, असे वाटायला लागले. एका टप्प्यावर अखेर मी नोकरी सोडून बंगळूरमध्ये ‘पूर्णब्रह्म’ रेस्टॉरंटची स्थापना केली. त्याची व्याप्ती आता जगभर पोचली आहे. येत्या काळात मला जगभरात अजून पाच हजार शाखा सुरू करायच्या असून त्यासाठी आम्ही तितक्‍याच खंबीरपणे कार्यरत आहोत. तसेच ‘‘महाराष्ट्रीयन पुरणपोळी, थालीपीठ, वरण-भात यांसारखे तब्बल १८२ मेन्यू आम्ही सध्या दररोज देतो. प्रत्येक थाळीला प्रत्येक वाराशी जोडले असून ‘शिरवाळे’सारख्या हजारो वर्षांपूर्वीच्या रेसिपीचा अभ्यास करून तीही उपलब्ध केली आहे. अर्थात, या साऱ्या प्रवासात या क्षेत्राचा केलेला परिपूर्ण अभ्यास खूप महत्त्वाचा ठरला.’’ आम्ही साप्ताहिक सुटी कधीच घेतली नसून पहाटे साडेतीनला आमचा दिवस सुरू होतो आणि घरातली सगळी जबाबदारीची कामं आटोपून आम्ही ‘पूर्णब्रह्म’कडे जातो. अखेर रात्री साडेबाराला काम संपतं. अर्थातच केवळ चार तासांची झोप पुरे आहे. मात्र, जे काम आम्ही सर्व मिळून करतो ते पूर्णपणे आनंदात करतो, असेही त्यानी यावेळी आवर्जून सांगितले.

अमराठी भागात शाखा विस्तार करताना भाषेपासूनच्या अनेक अडचणी असतात; पण त्याचे योग्य नियोजन केले की सर्व गोष्टी आपोआप जमत जातात. मणिपूर, नेपाळची मुलंही कामाला आहेत. त्यांना अथर्वशीर्ष, शुभंकरोति शिकवली असल्याचे सांगून मराठी असल्याचा अभिमान असायलाच हवा आणि तो बाणा जगभर दिमाखात मिरवला जायला हवा, असेही त्या म्हणाल्या. तसेच गर्भवती व बाळंतिणींसाठी विशेष सुविधा, लहान मुलांसाठी तब्बल ४८ मेन्यू, थाळी पूर्ण फस्त करणाऱ्यांना पाच टक्के सवलत, इन्फोसिस आणि सुधा मूर्ती यांच्याशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं, त्यांनी भेट दिलेली अंबाबाईची मूर्ती आदी गोष्टींवरही त्यांनी दिलखुलास संवाद साधला. तसेच यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या वतीने विविध क्षेत्रातील उद्योजिकाना आदर्श उद्योजिका सन्मानाचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. श्रेया कोगटा, प्रा. योगिता पाटील, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. मोनाली शर्मा यांनी सहकार्य केले तर सूत्रसंचालन प्रा.अंजली दायमा, प्रा.प्रिया टेकवानी, प्रा.बिपासा पात्रा यांनी व आभार प्रा. ज्योती जाखेटे यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक  प्रितम रायसोनी यांनी अभिनंदन केले.

जयंती कठाळे सांगतात…

प्रत्येक महिला ही दामिनी आहे. तिने उद्योग, व्यवसायात यायलाच हवे.

जे करायचे आहे त्याचे प्लॅनिंग करा. त्यासाठीची सपोर्ट सिस्टीम तयार करा आणि झपाटून कामाला लागा.

पती आणि पत्नीतील नातं अधिक पारदर्शक ठेवा. एकमेकांना बळ देतच आहे त्या क्षेत्रात यशाला गवसणी घाला.

पतीकडून हिऱ्याचे पेंडंट घेण्यापेक्षा ते आपण स्वतः विकत घेऊ, अशी जिद्द बाळगा.

प्रेम करायला शिका, प्रेम मिळत जाईल.

सासू असो किंवा आई; दोघींबरोबर आपली भूमिका स्पष्टपणे मांडा.

 

साडेतीन लाखांवर पुरणपोळ्या

रेस्टॉरंटमध्ये अगोदर सर्व कर्मचाऱ्यांचे पोट भरले जाईल, याची व्यवस्था केली आहे. त्यानंतर मग ते कामाला लागतात. त्यांच्याशी मैत्रिपूर्ण आणि निखळ नात्यासाठी जाणीवपूर्वक संवादाच्या विशिष्ट शैलीही विकसित केल्या. नऊवारी साडी आणि नथ हा पेहरावही ब्रॅंड बनवला. आजवर साडेतीन लाखांवर पुरणपोळ्या विकल्या. फ्रॅंचाईजीची घोषणा करताच तब्बल ३६ हजारांवर रिक्वेस्ट आल्याचेही जयंती कठाळे अभिमानाने सांगतात.

यांचा झाला सत्कार

भैरवी गुजराती, पायल बंसल, मिता बनवट, योगिता ढाके, डॉ. पल्लवी राणे, मीनल परदेशी, महेक कमानी, स्नेहल काबरा, वैशाली जैन या विविध क्षेत्रातील अभिमानास्पद कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, सॉफ्ट स्कील ट्रेनर तसेच प्रसिध्द साइकोलॉजिस्ट रम्या राजकुमार, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.