सोनी नगरात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ

0

सोनी नगरात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ

दोन घरफोड्या; सुमारे १ लाख ६३ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव : शहरातील पिंप्राळा शिवारातील सोनी नगर भागात गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन बंद घरे फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एकूण १ लाख ६३ हजारांच्या मुद्देमालावर हल्ला केला आहे.

३० नोव्हेंबर रोजी गणेश भगवान माळी हे सहकुटुंब मूळ गावी गेले होते. त्यांच्याच घराचा दरवाजा तुटलेला असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या आशा भोई यांनी ४ डिसेंबर रोजी सकाळी दिली. माहिती मिळताच माळी कुटुंब घरी परतले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले. चोरट्यांनी ३ तोळे सोन्याच्या बांगड्या, १० ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, ६ ग्रॅमचे कानातील टॉप्स असा ऐवज लंपास केला होता.

याच गल्लीतील सुनिल रामदास सुरवाडे यांच्या बंद घराचेही चोरट्यांनी कुलूप तोडले. त्यांच्या घरातून २५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी उचलली. दोन घरांमध्ये एकाच रात्री हात साफ केल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना तोंडाला मास्क व रुमाल बांधलेले चार संशयित चोरटे पहाटेच्या सुमारास फिरताना आढळले असून त्यांचा तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.