घरफोडी प्रकरणाचा उलगडा; चार जणांना अटक , ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील मोहाडी रोड, पार्वतीबाई काळे नगर येथील गाजलेल्या घरफोडी प्रकरणाचा रामानंद नगर पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक करून तब्बल ३१० ग्रॅम सोने, २५० ग्रॅम चांदी, रोख रक्कम व अन्य ऐवज असा एकूण ३६ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लीलाधर खंबायत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे साडू नरेंद्र बाध परदेशी असताना १५ मे ते १ जून दरम्यान त्यांच्या पार्वतीबाई काळे नगर येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. चोरट्यांनी ३५७ ग्रॅम सोन्याचे दागिने, २५० ग्रॅम चांदीची भांडी व दागिने, ८५ हजार रुपये रोख तसेच डीव्हीआर व वायफाय मॉडेल असा मुद्देमाल चोरून नेला होता.
गस्तीवरून लागला सुगावा
तपासादरम्यान, १९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या गस्तीवर असताना सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या पथकाला दोन संशयित इसम आढळले. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यानुसार रवि प्रकाश चव्हाण (२१, रा. तांबापूरा) आणि शेख शकील शेख रफीक (३०, रा. रामनी गंज) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दुसऱ्या दिवशीच त्यांचे साथीदार जनंद उर्फ मस्तकीम भिकन शहा आणि गुरुदयालसिंग मनजित टाक यांनाही ताब्यात घेतले.
जामनेर व सुरत येथे विकलेले सोने जप्त
आरोपींनी चोरी केलेले दागिने जामनेर आणि सुरत येथे विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून विकलेला ऐवजही हस्तगत केला. या कामगिरीमुळे केवळ पार्वतीबाई काळे नगर येथीलच नव्हे, तर आणखी दोन घरफोडी आणि एक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
रामानंद नगर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असून, गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांनी दाखवलेली तत्परता वाखाणण्याजोगी ठरत आहे.


