रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
रावेर तालुक्यातील थेरोळा येथील 22 वर्षीय तरुणामध्ये गिलियन बरे सिंड्रोम सदृश्य लक्षणे आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच आरोग्य विभागाने तत्काळ ॲम्बुलन्सद्वारे त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील चाचण्या व उपचारासाठी त्याला जळगाव येथे हलवण्यात आले आहे.
सदर तरुण कुंभमेळा प्रयागराज येथून परतल्यानंतर तब्येत बिघडल्याने एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जिबीएस सदृश्य लक्षणांची शक्यता व्यक्त केली होती. या प्रकाराची माहिती मिळताच प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरोग्य विभागाच्या सूत्रांनीही या प्रकरणाची पुष्टी केली आहे.आरोग्य विभागाने सद्यस्थितीत तपासणीसह प्रतिबंधात्मक उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. थेरोळा व परिसरातील नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गिलियन बरे सिंड्रोमच्या लक्षणांमध्ये हात-पायांमध्ये मुंग्या येणे किंवा बधिरपणा यापासून वरच्या दिशेने होणारी कमजोरी हलकासा झटका किंवा कळ येणे चालण्यात अडचण, हात आणि पाय हलवण्यास त्रास बोलणे, चावणे किंवा गिळणे यामध्ये अडचण श्वास घेण्यास त्रास इत्यादीचा समावेश आहे.