मोठी कारवाई.. ५ गावठी कट्ट्यासह १० राउंड हस्तगत; दोन जण ताब्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील उमर्टी भागात गावठी पिस्तूल आणि काडतुस आणून जिल्ह्यात त्याची विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार एक विशेष पथक तयार करून शुक्रवारी पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने चोपडा पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत २ जण ताब्यात घेण्यात आले आहेत, तर दोन जणांनी पळ काढला. या कारवाईत पथकाने ५ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुस, १ चारचाकी आणि २ मोबाईल असा ऐवज हस्तगत केला आहे.

चोपडा ग्रामीण पो.स्टे. च्या हद्दीमध्ये शनिवारी काही तरुण गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. दरम्यान चोपडा पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करून छापा टाकला या कारवाईत मयूर काशिनाथ वाकडे रा. अरुणनगर चोपडा, अक्रम शेरखान पठाण रा. हरसूल औरंगाबाद यांना अटक करण्यात आली आहे. तसेच अरुण नवनाथ सोनवणे रा. निगडी, पुणे व कट्टे देणारा लाखनसिंग मोहसिंग बरनालारा रा. उमर्टी हे पळून जाण्यात यशस्वी झाले.

या कारवाईत संशयितांकडून पथकाने १ लाख ५० हजारांचे ५ गावठी पिस्तूल, १० हजारांचे १० काडतूस, एक चारचाकी, २ मोबाईल असा ६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बापू रोहम, सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक फौजदार बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे संदीप पाटील, प्रवीण मांडवी, दीपक शिंदे, चोपडा ग्रामीण पोस्टेचे हवालदार शिंगणे, सुनील जाधव, राकेश पाटील यांनी सदर कारवाई केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.