ट्रॅक्टर धुण्यासाठी खदानीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
दसऱ्याच्या दिवशी घडली लिंबेजळगाव येथील घटना
गंगापूर प्रतिनिधी ऐन दसऱ्याच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथे ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे गाव हादरले असून, परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये दोघे सख्खे भाऊ, एक आतेभाऊ आणि एक शेजारील कुटुंबातील मुलगा असल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मृत मुलांची इरफान इसाक शेख (१७) , इम्रान इसाक शेख (१३) , झेन हयात पठाण (९) , व्यंकटेश ऊर्फ गौरव दत्तू तारक (९) अशी नावे असून सर्व मृत लिंबेजळगाव येथील रहिवासी आहेत.
जाहेद रसूल पठाण यांच्या कुटुंबातील इरफान (१७) हा वडिलांना शेतीकामात मदत करतो. इम्रान (१३) हा जिल्हा परिषद शाळेत सातवीत शिकत होता, तर झेन (९) वसतिशाळेत चौथीत आणि व्यंकटेश (९) हा शेजारील दत्तू तारक कुटुंबातील असून, जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकत होता. गुरुवारी सकाळी १० वाजता दसऱ्याच्या सुट्टीमुळे हे चारही मुले ट्रॅक्टर धुण्यासाठी घराजवळील खदानीकडे गेली. मुरुम उपसा झाल्याने त्या ठिकाणी खोल खड्डा तयार झाला होता. ट्रॅक्टर धुतल्यानंतर इरफानने वाहन बाजूला केले आणि तिघे लहान मुले पोहण्यासाठी पाण्यात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी इरफाननेही पाण्यात उडी मारली, परंतु चौघांचाही दमछाक होऊन मृत्यू झाला.
सकाळी ११:३० च्या सुमारास आजोबा जाहेद पठाण यांना मुले घरी न परतल्याने शंका आली. इरफानला फोन केला, परंतु उत्तर न मिळाल्याने ते घटनास्थळी धावले. तेथे मुलांचे कपडे, चपला आणि ट्रॅक्टर सापडला, पण मुले दिसली नाहीत. तात्काळ गावकऱ्यांनी मदत मागवली आणि अग्निशमन दलाला कळवले.
गंगापूर अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू झाले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढले गेले. मृतदेह postmortem साठी वाळूज येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे कुटुंब आणि गावात शोकाची लाट उसळली असून, प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे खदानी आणि अवैध उत्खननाच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडून अशी ठिकाणे सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.

