गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वयंशिस्त शिकली पाहिजे : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शब्दांकन – राहुल पवार

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्या व्यक्तिगत सामाजिक जबाबदाऱ्या आहेत, हे विसरू नका. जेणेकरून समाजातील दिव्यांग व्यक्ती, वृद्ध, रुग्ण तसेच महिलांना कुठलाही त्रास होणार नाही. ज्या व्यक्तींचा गणेशोत्सवाशी व्यक्तिगत संबंध नसतो त्यांना आपल्यामुळे कोणतीही बाधा येऊ नये याची काळजी घ्यावी. ज्याप्रमाणे आपण आपल्या इतर अलिखित कायद्यांना पाळत असतो, तसेच शासकीय कायद्यांचेही पालन केले तर कुठल्याही सणाला गालबोट लागणार नाही. कायदा हा प्रत्येक वेळी शासनानेच आणला पाहिजे, असे नसून त्यात आपण गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वयंशिस्त शिकली पाहिजे, असे आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी लोकशाहीच्या कार्यालयात आरतीच्या वेळी केले.

मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात आरतीसाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत,  रेड क्रॉस रक्तपेढीचे चेअरमन तथा तारा कम्प्युटराईज लॅबचे डॉक्टर प्रसन्न कुमार रेदासनी, सॅटर्डे क्लबचे सचिव तथा एस डी इव्हेंट्सचे संचालक दिनेश थोरात उपस्थित होते. आरतीनंतर मान्यवरांशी चर्चा करून आठवणीतल्या गणेशोत्सवाच्या स्मरणिकांना उजाळा दिला.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी आठवणी सांगतांना सांगितले की, “२००५ ला मी बारावीत होतो. त्यामुळे २००४ चा गणपती झाल्यानंतर घराबाहेर पडलो. त्यानंतर गणेशोत्सव असा घरी म्हणून नाहीचा. कारण ज्या ठिकाणी शिकायला होतो त्याच ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला गेला. त्यामुळे घरच्या गणपतीची आठवण ही नेहमी यायची. २००५ नंतर २०१७ ला मला गणेशोत्सव साजरा करता आला. लग्नानंतर सांगलीला असताना २०१७ ला आम्ही जवळजवळ तेरा वर्षांनी गणपती बसवला. त्यामुळे हा गणेशोत्सव माझ्यासाठी विशेष आठवणीचा आहे. तो गणेशोत्सव आम्ही मोठ्या धामधुमीने केला होता. सांगलीला असतानाची ही आठवण माझ्यासाठी विशेष आहे. तेव्हा नुकतेच लग्नही झाले  होते आणि नव्याने शासकीय सेवेत रुजू झालो होतो. त्यावेळी पुन्हा एकदा आमच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती. घरचा गणपती अजूनही आठवतो मी अजूनही त्या आठवणींना मिस करतो.”

“कधीतरी एक वर्ष असं येईल की, घरचा गणपती बसवता येईल, संपूर्ण दहा दिवस गणेशोत्सवाचा आनंद घेता येईल अशी आशा करतो, कारण हल्ली जे गणपती बसवतो ते शासकीय गणपती म्हणून बसवले जातात मात्र घरचा गणपती बसवण्याची मी अजूनही वाट पाहत आहे.” असे डॉ. अभिजित राऊत म्हणाले.

डॉक्टर प्रसन्न कुमार रेदासनी यांनी यावेळी एक गमतीदार आठवण सांगितली. ते म्हणाले , “मी त्यावेळी स प महाविद्यालयात होतो. पुण्याला. मला रात्रीच्या जागरणाची सवय नव्हती. कॉलेजमधून आल्यावर मी थकून जायचो. त्यानंतर सुमारे आठ वाजेला जेवण करून झोपून जायचो. कॉलेजवरून आल्यावर फक्त दीड दोन तास अभ्यासाला मिळायचे. कारण झोप फार प्रिय होती. त्यामुळे आठला झोपायचं आणि सकाळी सात वाजेला उठायचं. हा दिनक्रम ठरलेला. त्यानंतर बारावीच्या वर्षाला सुरुवात झाली त्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स या चार विषयांचा जास्त अभ्यास करायचा. मात्र इंग्लिश आणि मराठी यांचा अभ्यासही करत नव्हतो. भाषेचे विषय आहे, त्यामुळे ग्रुप मध्ये काही याचे मार्क मिळणार नाही अशी एक धारणा. त्यामुळे यांचा अभ्यास नाहीच. मात्र इंग्रजीच्या पेपरच्या एक दिवस आधी पुस्तक उघडून बसलो होतो. ते हायर इंग्लिश, त्यामुळे दडपण आलेलं. मग फक्त एक नजर फिरवायची म्हणून त्या लेसनच्या आधी असलेल्या सारांशावर नजर फिरवली आणि पेपर दिला. मराठीचा पेपरला हेच पॅटर्न अंगीकारलं.”

“पेपर आटपले. पण भीती होती इंग्रजी विषय राहतो की काय. इतर विषयांचा काही टेन्शन नव्हतं, पण लँग्वेजच्या विषयांची भीती वाटत होती. काय करावं हे सुचत नव्हत. आमच्या शेजारी वडिलांचे मित्र राहत होते, खाचणे म्हणून. त्यांच्या पत्नी म्हणजे त्या काकू आम्हाला फार जवळच्या. त्यांना ही भीती सांगितली. त्या म्हटल्या काही काळजी करू नको. मी तुला एक छोटासा श्लोक देते. त्या श्लोकची तू माळा जप. तो श्लोक होता ‘एकदंताय विदमहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोधनती प्रचोदयात’. त्यांनी सल्ला दिला की रिझल्ट लागेपर्यंत रोज या श्लोक ची एक माळा जपायची. भीतीपोटी मीही ते करत गेलो. पेपर तर दिला गेला होता. मात्र आता करणार काय, हा एकच उपाय दिसून येत होता.”

“विद्यार्थी दशा होती. त्यामुळे कुणीतरी मोठे सांगत यावर विश्वास बसला. पण तरी एक वाटलं की निदान या श्लोक मुळे पेपर तपासणाऱ्याची तरी मानसिकता बदलेल. ही एक धारणा वाटत गेली आणि शेवटी ते झालंच. त्यांनी विशेष असा पेपर न तपासता कदाचित वरच्यावर तो तपासला असावा आणि मी मराठी ४७ मार्कांनी आणि इंग्रजीचा अगदी काठावर पास असा ३५ मार्कांनी पास झालो. आज या आठवणीचं  हसू येतं. मात्र त्या वेळच्या विद्यार्थी दशेत भीती घालवण्यासाठी म्हणा किंवा काही अंधश्रद्धा म्हणून म्हणा या अनुभवातून मी गेलो आहे.” हा किस्सा सांगताना डॉ. प्रसन्न कुमार रेदासनी यांना हसू आवरत नव्हतं.

यावेळी दिनेश थोरात यांनी सांगितले की, ”गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी अर्थात अनंत चतुर्दशीला बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा असायची. यावेळी आम्ही हातात चक्क डबा घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रसादाला जात असू. तो एकत्रित केलेला प्रसाद, त्याची सगळी सळ मिसळ मग घरी आल्यावर आम्ही खायचो. त्यावेळी त्यासोबत लिमलेटच्या गोळ्या, आसमानताराच्या गोळ्या मिळायच्या. तेव्हा त्याच फार विशेष कौतुक असायचं. दोन-चार दिवसांची खाऊची पूर्ण सोय झालेली असायची.”

“त्यावेळी आम्ही गोणपाट आणि काड्या लावून छान पैकी डोंगर वगैरेच डेकोरेशन करत होतो. तेव्हा पाच दहा पैशाला ते खेळण्यातले सैनिक मिळायचे. ते त्यात छान पैकी रचून देखावा तयार करायचो. दहा पैशात तीन खेळणी येत असतात. कधी कधी गणेशोत्सवाच्या तीन-चार महिने आधीपासून पैशांची जमवाजमव करून खेळणी जमा करत असू, जे योग्य वाटलं ते राखून ठेवलं जायचं. जेणेकरून गणेशोत्सवात डेकोरेशन साठी उपयोगात येईल. एकवीरा देवीच्या यात्रेमध्ये देखील आम्ही जाऊन खेळणी जमा करून ठेवायची. जत्रेमध्ये ती दिव्याची पाण्यावर चालणारी बोट मिळायची. तिचा आवाज आकर्षित करायचा. त्यामुळे त्याचा फार कौतुक होतं. ती बोट घेऊन आम्ही परातात पाणी ठेवायचं आणि त्यात ती गणपती समोर चालू करून द्यायचो. त्याच्यातच खूप आनंद सामावलेला असायचा.”

Leave A Reply

Your email address will not be published.