आपल्या श्रद्धांच्या भोवती घट्ट उभे रहा, त्यातूनच संस्कृतीचे दर्शन

भरात अमळकर यांचे लोकशाहीच्या गणेश आरतीवेळी नागरिकांना आवाहन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आपण आपल्या श्रद्धांच्या भोवती घट्ट उभे राहायला पाहिजे. त्यातूनच आपल्या संयमाचे आणि संस्कृतीचे खऱ्या अर्थाने दर्शन होत असते. सध्या जळगावमध्ये जी उत्साहातली गणेश विसर्जनाची मिरवणूक आपण पाहत आहोत, तिच्या मागे नक्कीच दादा डॉक्टर अविनाश आचार्य आणि त्या वेळच्या गणेश स्वयंसेवकांचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन केशव स्मृती प्रतिष्ठान जळगावचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी लोकशाही कार्यालयात श्री गणेशाच्या आरतीच्या वेळी केले.

गुरुवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी लोकशाही कार्यात आरतीसाठी केशव स्मृती प्रतिष्ठान जळगावचे अध्यक्ष भरत अमळकर, अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन गांग, वास्तुशास्त्र विशारद अविनाश कुलकर्णी, जळगावचे प्रसिद्ध रंगकर्मी हर्षल पाटील आणि एलआयसीचे प्रशांत छाजेड उपस्थित होते. आरतीनंतर मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्या आठवणीतल्या गणपतीच्या स्मरणिका ऐकल्या.

यावेळी भरत अमळकर म्हणाले, “ते वर्ष होतं १९८३. त्यावेळी सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रमुख होते डॉ. अविनाश आचार्य. ज्यांच्यामुळे मी या कार्यात आलो. १९८३ मध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान शहर पोलीस स्टेशनच्या समोर आलेली असताना एक अशी अफवा उठली की, कुणाचा तरी खून झाला. प्रत्यक्षात मात्र चांदेलकर म्हणून एका व्यक्तीला त्याच्याच ओळखीच्या व्यक्तीने चाकूने जखमी केले होते. हा वाद व्यक्तिगत दोन हिंदू माणसांचा होता. मात्र याबद्दल हिंदू मुस्लिम वादाची ठिणगी पडल्याची अफवा जोरदार उसळली. त्याचा परिणाम म्हणून जोरदार धक्काबुक्की सुरू झाली. मात्र सांगायला प्रचंड वाईट वाटतं की, त्यावेळी या परिस्थितीची सत्यता जाणून न घेता फक्त एका अफवेच्या आधारावर आपल्याच काही हिंदू लोकांनी मिरवणुकीतच आपल्या हाती असलेल्या गणेश मूर्ती आहे त्या जागीच टाकून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला. त्या ठिकाणी निर्माण झालेलं हे दृश्य फार दयनीय आणि मनाला चटका लावणारं होतं. कारण लोकांनी गणेश मूर्ती रस्त्यावरच टाकून पळ काढला होता. तिथे असलेला गणेश मूर्तींचा खच पाहता मन हलवून टाकणारी स्थिती निर्माण झाली होती. हे सार्वजनिक वर्तन प्रचंड निंदनीय होतं. मी या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे.”

हे सर्व झाल्यावर पोलिसांनी तिथे असलेल्या काही स्वयंसेवकांच्या मदतीने त्या गणेश मूर्तींचे विसर्जन केलं होतं. पण डॉ. आचार्य दादांना हे फार अस्वस्थ करणारं होतं. कारण ते मुळात श्रद्धाळू. त्यांना वाईट वाटलं मात्र ते फक्त वाईट वाटून घेणाऱ्यातले नव्हते. त्यांनी पुढच्या १९८४ च्या गणपतीच्या चार महिन्यांपूर्वी सर्व मंडळांमध्ये गेले आणि प्रत्येक ठिकाणी मीटिंग घेऊन ८३ च्या गोंधळाबद्दल चर्चा केली. नेमकी अशी काय परिस्थिती तुमच्यावर ओढावली होती की तुम्ही हातातल्या गणेश मूर्ती आहे त्या जागी टाकून पळून गेला. असा सवालही केला त्यावेळी प्रत्येकाला केला. याबाबत जागरूक करून त्यांनी पुढल्या वेळी कोणतीही आणि कितीही बिकट परिस्थिती असली तरी असं कृत्य करणार नाही असा शब्द घेतला.”

यावेळी सुदर्शन गांग म्हणाले, “मी जवळजवळ पंचवीस तीस वर्षे झाले शांतता कमिटी मध्ये आहे. सुमारे १२-१३ वर्षांपूर्वी मला एकदा मिरवणुकीच्या ऑब्झर्वेशनसाठी तीन वर्ष जबाबदारी देण्यात आली होती. एक वर्षी असं झालं की मिरवणुकीला मज्जित असलेल्या मार्गाने घेऊन जायचं असं मंडळांनी ठरवलं. आता नेमका पेच पडला होता ही परिस्थिती कशी हाताळायची. मात्र आमचे एक मित्र होते, महबूब खान गदर म्हणून. त्यांनी याला मोठे सहकार्य केले होते. त्यांनी असं ठरवलं की यावेळी मज्जित समोरून जाणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाच्या आपण सत्कार करावा. मात्र कुठून तरी सुमारे ट्रॅक्टरभर गुलाल त्या ठिकाणी अचानक येऊन पोहोचला आणि शांततेची जबाबदारी असलेल्यांची दाणादाण उडाली.”

त्यावेळी आमच्याइथे पी टी पाटील म्हणून एक ठाणेदार होते. आम्ही त्यांना बाजीराव म्हणायचो. ते अमरावतीला तेव्हा डीसीपी होते. त्यांच्याकडे पूर्ण बंदोबस्त होता. या प्रकरणामुळे तिथे प्रचंड तणावाचा वातावरण निर्माण झालं होतं. त्या पोलिसांनी एक शक्कल लढवली होती. त्यांनी सिव्हिल ड्रेस मधले काही पोलीस मिरवणुकीत सोडले होते. ते उच्छाद मांडणाऱ्यांना मिरवणुकीतच पुढे घेऊन जायचे. मात्र ती मंडळी काही ऐकणाऱ्यातली नव्हती. ते पुढे जायचे आणि पुन्हा फिरून आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचायचे. त्यावेळी मी एक बघितलं की पोलिसांच्या दृष्टिकोनातून फक्त शांतता प्रस्थापित करणे, हा एकच महत्त्वाचा उद्देश असतो. त्याचं त्यावेळी फार कौतुक वाटलं होतं. कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचा अधिकाराचा गैरवापर न करता अगदी संयमाने प्रचंड शांततेने ती मिरवणूक पार पाडली होती. पोलिसांच्या या संयमी आणि समजदार वृत्तीला मी अगदी जवळून पाहिला होतं. त्यामुळे गणपती विसर्जनाची मिरवणुकीची ही आठवण कायम माझ्या लक्षात आहे.”

यावेळी अविनाश कुलकर्णी यांनी सांगितले, “माझं बालपण इथेच बळीराम पेठेत गेलं. मला चांगला आठवतं आम्ही गल्लीतल्या काही पाच सहा पोरांनी मिळून दत्त गणेश मंडळ स्थापन केलं होतं. त्यावेळी वर्गणी म्हणून चारआणे, आठआणे मिळत असे. ही मिळालेली छोटेखानी वर्गणी जमा करत आम्ही त्यातून कोणता गणपती घ्यायचा ते बजेटनुसार ठरवत असो. आम्ही रोज मिळालेली रक्कम लक्षात घेऊन गणपतीची मूर्ती बघायला जायचो. दुसऱ्या दिवशी रक्कम वाढली की आमचा बजेट थोडा वाढलेला असायचा. आधी सात रुपयांवर ठरलेली मूर्ती आता नऊ रुपयांवर येऊन ठेपलेली असायची. असं त्यावेळी आमचं स्वरूप होतं. त्यावेळी आमची लिमये म्हणून एक ओळखीचे काका होते. ते आम्हाला त्या वेळचे पाच रुपये वर्गणी द्यायचे. मात्र यालाही काही अटी आणि शर्ती असायच्या. कारण ही वर्गणी घ्यायला त्यांच्या योग्य वेळेसाठी प्रचंड वाट पाहावी लागायची. त्यांची झोपमोड होणार नाही, त्यांच्या कामात व्यस्त येणार नाही याची दक्षता पाळली गेली तरच ती पाच रुपये वर्गणी तेव्हा मिळायची. मी राहतो बळीराम पेठेत आणि ते राहायचे रिंग रोड परिसरात. त्यामुळे आम्ही सायकलवर त्यांची वेळ साधली जाते का हे पाहण्यासाठी त्यांच्या घरी चक्कर मारत असू. आलेल्या वर्गणीतून मग आमचा गणेशोत्सव साजरा व्हायचा. अशा बऱ्याच आठवणी आहेत ज्या हळूहळू विकासासोबत आम्ही अनुभवल्या आहेत त्या आजही आठवणीत कायम आहेत.”

 

शब्दांकन : राहुल पवार 

उपसंपादक

दै. लोकशाही

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here