“सर्वजण न घाबरता सण उत्सवात सहभागी होतील तो यशस्वी उत्सव”

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

“यशस्वी सण उत्सव म्हणजे आपल्यामुळे इतर कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेत साजरा केलेला सण. कोणताही सण उत्सव असा असावा की, त्यामध्ये प्रत्येक अबालवृद्धापासून पुरुष तसेच विशेषतः महिलांना न घाबरता अगदी आनंदाने सहभागी होता यावे. प्रत्येक सणाचे स्वरूप अशा स्वरूपाचे असले, म्हणजे तो अगदी यशस्वी आणि परिपूर्ण असा उत्सव समजला जाईल, असे मत जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात श्री गणेशाच्या आरती प्रसंगी व्यक्त केले. यावेळी आरतीसाठी पारोळ्याचे आमदार चिमण आबा पाटील, फूड अँड ड्रग्सचे सहाय्यक आयुक्त संदीप पतंगे, तसेच आनंद डायलिसिसचे डॉ. अमित भंगाळे व डॉ. नेहा भंगाळे देखील उपस्थित होते.

दै. लोकशाहीच्या कार्यालयात दरवर्षीप्रमाणे शहरातील उच्चपदस्थ व्यक्तींच्या हातून श्री गणेशाची सायंकाळची आरती करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये पहिल्या दिवशी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत श्री गणेशोत्सवाच्या उत्सवाचा प्रसंग सर्वांना कथन केला.

यावेळी ते म्हणाले, “अलीकडच्या काळात गणेशोत्सवाचे स्वरूप आमच्या लहानपणी पेक्षा अगदी बदललेले आहे. आम्ही त्याकाळी हात गाडीवरून श्री गणेशाची मिरवणूक घेऊन जायचो‌. आमच्या काळी डीजे नसायचा. एक ढोल आणि एक ताशा हाच आमचा डीजे. ही वाद्य छोटी असली तरी त्यावर लुटला जाणारा आनंद हा प्रचंड असायचा. आरतीच्या वेळीचे क्षण आजही डोळ्यासमोर उभे राहतात. त्यावेळेची सजावट करणे, आरती करणे, आरती नंतर प्रसाद वाटप हे सारं काही आजही आठवतं.”

“नंतरच्या काळात नवोदय विद्यालयात शिक्षणासाठी गेलो आणि मग हे सारं होस्टेलमध्ये होऊ लागलं. दरम्यान 2013 मध्ये माझी पहिली पोस्टिंग अकोला येथे झाली. यावेळीच्या बंदोबस्ताची पहिली जबाबदारी ही माझ्यावर होती. तो माझा शासकीय सेवेतला पहिला गणेशोत्सव. विविध ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो. मात्र पुण्याला त्याचं स्वरूप इतर जिल्ह्यांपेक्षा फार मोठं असतं. त्यामुळे बंदोबस्तालाही तब्बल 40 ते 42 तास सतत कर्तव्यावर राहावं लागतं. सुप्रीम कोर्टाचा रात्री बारा ते सकाळी पाच पर्यंत कोणतीही मिरवणूक करू, नये असा आदेश असतो. तेवढाच काय तो विसावा मिळतो. त्यानंतर पुन्हा पाच वाजेपासून कर्तव्य सुरू होते. जळगावचा गणेशोत्सव हा माझा पहिला गणेशोत्सव असणार आहे. कारण गेल्यात दोन वर्षात कोरोनामुळे जळगाव शहराचा गणेशोत्सव मी पाहू शकलो नाही. मात्र जळगावच्या गणेशोत्सवाची देखील एक विशेष अशी खासियत असल्याचं मी ऐकून आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी अनोखा असेल,” असेही डॉक्टर प्रवीण मुंडे यावेळी म्हणाले.

आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आणखी एक विशेष अनुभव सांगितला. ते म्हणाले, “रत्नागिरी येथे सार्वजनिक गणेशोत्सवाला फारसं महत्त्व नाही. तिथे प्रत्येक घराघरात गणपती बसतो. सार्वजनिक गणपती त्या ठिकाणी असून नसल्यासारखा आहे. मिरवणूक हा प्रकार तर अगदी नगण्य आहे. मात्र तिथे असलेला घराघरातला गणपती हा विशेष आकर्षणाचा विषय असतो. एकमेकांच्या घरी जाऊन नातेवाईक शेजारी मित्रमंडळी या गणेशोत्सवात आनंदाने आणि सात्विकतेने सहभागी होतात. त्यामुळे बरेचशे चाकरमाने मुंबईतून गणेशोत्सवासाठी रत्नागिरी, कोकण या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. एक पोलीस अधिकारी म्हणून या गणेशोत्सवाचं कौतुक यासाठी वाटतं की, या ठिकाणी बंदोबस्तासाठी कोणत्याही ताण पोलिसांवर नसतो. कायदा सुव्यवस्थेची भीती नसते. त्यामुळे रत्नागिरी, कोकण यासारखे गणेशोत्सव विशेषतः पोलीस म्हणून कर्तव्य बजावत असताना अधिक आवडतात.”

“गणेशोत्सवाचे स्वरूप छोटं असावं असं मी म्हणणार नाही मात्र ते कुणालाही त्रासदायक ठरेल असे असू नये हे मात्र नक्कीच कारण गणेशोत्सव छोट्या स्वरूपात झाला तर बऱ्याच अडचणी निर्माण होतात आणि तो मोठ्या स्वरूपात झाला तर सामाजिक भावने सोबतच रोजगारांना संधी देखील उपलब्ध होत असतात यामध्ये मूर्तिकारांपासून तर गणेशोत्सवाच्या आरास पूजा वगैरे सर्व इतर गोष्टींसाठी लागणाऱ्या विक्रेत्यांचा रोजगार निर्माण होत असतो. आपल्याकडे इतर धर्माचे लोकही गणेशोत्सवात आनंदाने सहभागी होतात त्यामुळे या लोकांच्या भावनांचाही आदर यावेळी करणे गरजेचे असते.”

यावेळी विशेष म्हणून सांगताना डॉक्टर प्रवीण मुंडे म्हणाले की, “उत्सव कोणताही असो, तो साजरा होत असताना इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. जर 50 लोकांचा सहभाग एखाद्या ठिकाणी असेल तर तिथे हजार लोकांचा आवाज असण्याची गरज नाही. त्यामुळे आजूबाजूला बरेच विद्यार्थी, रुग्ण, वृद्ध असून त्यांना याचा त्रास होत असेल, याची भावनिकता जपणे फार गरजेचे आहे. अशा तीव्र स्वरूपात जर गणेशोत्सव साजरा होत असेल, तर तो नक्कीच त्रासदायक ठरेल. मात्र एक सामाजिक दायित्व म्हणून, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करून, जर गणेशोत्सव किंवा इतर कोणताही उत्सव साजरा झाला तर तो नक्कीच कौतुकास्पद राहील. यंदाच्या गणेशोत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेत गणेशोत्सव आनंदाने साजरा करूया,” अशी इच्छा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी लोकशाहीच्या माध्यमातून व्यक्त केली.

यावेळी उपस्थित असलेले पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी देखील आपण आपल्या लग्नानंतर गणेश मूर्ती स्थापन करण्याला सुरुवात केली असल्याचे सांगितले. सोबतच लोकशाहीच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील आनंद डायलिसिसचे डॉक्टर अमित भंगाळे व डॉक्टर नेहा भंगाळे देखील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “सार्वजनिक गणेशोत्सवात आम्हालाही सहभागी व्हायला आवडते. अलीकडचे गणेशोत्सवाचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे. मात्र अलीकडच्या व्यस्त शेड्युलमुळे ते शक्य होत नाही. आमच्या लहानपणी ते अगदी सामान्य मात्र आता सारखेच उत्साही असे होते. त्यावेळीचा आनंद त्या आठवणी आजही आठवतात.”

यावेळी उपस्थित असलेले फूड अँड ड्रग्सचे सहाय्यक आयुक्त संदीप पतंगे यांनी देखील आपल्या एका विशेष आठवणीचा उजाळा करून दिला. ते म्हणाले, “आम्ही दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. मात्र हल्लीच्या काळात गणेशोत्सवासाठी जास्त वेळ देणे मला आणि माझ्या पत्नीला शक्य होत नाही. मात्र गणेशोत्सवाची परंपरा खंडित होणार नाही याची दक्षता घेत आम्ही दरवर्षी दीड दिवसाचा का होईना मात्र बाप्पाला घरी आणतो आणि गणेशोत्सव आनंदाने साजरा करतो.”

शब्दांकन : राहुल पवार 

उपसंपादक

दै. लोकशाही

Leave A Reply

Your email address will not be published.