किनगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यातील दहिगाव येथे रोटावेटरचे काम करत असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. २३) दुपारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, अवघ्या काही दिवसांवर आलेला विवाह सोहळा काळाने हिरावून नेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथील योगेश यशवंत पाटील (वय २८) हा शेतीकामासाठी ट्रॅक्टरद्वारे रोटावेटर करत होता. बबलू उर्फ शोभराज रमेश महाजन यांच्या मोहराळे शेतात तो काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला. यावेळी तो थेट ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडला व रोटावेटरमध्ये अडकून जागीच त्याचा मृत्यू झाला.
घटना घडली तेव्हा ट्रॅक्टर सुरूच असल्याने ते सरळ शेजारच्या शेतात जाऊन थांबले. शेतातील झाडाखाली बसलेल्या एका तरुणाने हा थरारक प्रकार पाहताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टर बंद केले. त्यानंतर त्याने मोबाईलद्वारे योगेशच्या कुटुंबीयांना माहिती दिली. वडील व नातेवाईक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि गंभीर अवस्थेतील योगेशला यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी राजेंद्र यशवंत पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तडवी व सहकारी करीत आहेत.
१८ जून रोजी होता विवाह
विशेष म्हणजे, मयत योगेश पाटील याचा विवाह अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला होता. १८ जून रोजी त्याचा विवाह पार पडणार होता. मात्र लग्नाआधीच काळाने त्याच्यावर झडप घातल्याने आनंदाचे वातावरण दुःखात बदलले. या दुर्दैवी घटनेमुळे दहिगाव गावासह परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


