भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील निंभोरा येथील सुपुत्र आणि सध्या भारतीय सैन्यदलात सेवेत असणाऱ्या शरद धोंडु बाविस्कर (वय ३६) वर्ष या जवानाचा बिशनपुर (मणिपुर) येथे दि. ८ रोजी शुक्रवारी मृत्यु झाला होता. ते कर्तव्यावर असतांना गोळी लागुन त्यांना विरमण आले. या शहिद जवानावर त्यांचे गावी निंभोरा ता. भडगाव येथे दि. ११ रोजी सोमवारी दुपारी १२. ४५ वाजता शोकाकुल वातावरणात व शासकीय इतमामात या जवानाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा साडेचार वर्षाचा मुलगा रियांश बाविस्कर याच्या हस्ते पार्थीवाला अग्निडाग देण्यात आला. यावेळी पोलीसांनी मानवंदना दिली. यावेळी मोठया संख्येने नागरीक, नातेवाईक मंडळी, महिला, तरुण मंडळींची उपस्थिती होती.
शहिद जवान शरद बाविस्कर यांच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील नागरीक, नातेवाईक, तरुण मंडळींनी जोरदार तयारी केलेली होती. गावात ठिकठिकाणी डिजीटल बॅनर, रांगोळया काढलेल्या होत्या. या जवानाचे पार्थिव हे दि. ११ रोजी सोमवारी मणिपुर येथुन विमानाने दिल्लीमार्गे संभाजीनगर येथे आणण्यात आले. छत्रपती संभाजीनगरहुन पार्थिव सकाळी १० वाजता निंभोरा गावात अॅम्बुलन्सने आणण्यात आले. यावेळी जवानाच्या आईसह परीवार, नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.
गावात सजविलेल्या ट्रॅक्टरवरुन सवादय मिरवणुक काढण्यात आली. तीनशे मिटरचा लांब कापडी तिरंगी ध्वज तरुणांनी हातात धरुन या मिरवणुकीत मिरविला. यावेळी तरुणांनी वंदे मातरम, भारत माता कि जय अशा घोषणा दिल्या. तसेच साऊंडवर घर कब आ ओगे, ऐ वतन तेरे लिये, वंदे मातरम वंदे मातरम माॅ तुझे सलाम, तेरा जलवा जलवा आदि देशभक्ती गितांनी परीसर दुमदुमला होता.
अंत्ययात्रा मिरवणुकीत नागरीक, नातेवाईक मंडळी, महिला तरुण मंडळी मोठया संख्येने सहभागी होते. या जवानाला निंभोरा शिवारातील भडगाव रस्त्यालगत शेतात शरद बाविस्कर या जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा साडेचार वर्षाचा लहान मुलगा रियांश बाविस्कर याचे हस्ते या जवानाच्या पार्थिवाला अग्निडाग देण्यात आला. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जवानाला पोलीसांनी मानवंदना दिली. तर यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मंडळींनी या जवानास पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहीली व पार्थिवाचे दर्शन घेतले.
यावेळी आमदार किशोर पाटील, पाचोरा येथील अमोल पंडितराव शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सुर्यवंशी, योजना पाटील, प्रताप पाटील, डाॅ. निळकंठ पाटील, डाॅ. उत्तमराव महाजन, गणेश परदेशी, विजय साळुंखे, रतन परदेशी, संजय पाटील, हर्षल पाटील, दिलीप शेंडे, संभाजी भोसले, एस डी खेडकर, नरेंद्र सुर्यवंशी, रतन परदेशी, गोरख पाटील, अशोक परदेशी, दत्तु मांडोळे, आजी-माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, तहसिलदार शितल सोलाट आदि अधिकार्यांनीही पुष्पचक्र अर्पण करुन या शहिद जवानाला श्रद्धांजली वाहीली.
जळगाव जिल्हा सैनिक बोर्ड अधिकारी रतीलाल महाजन व त्यांची टीम, सुभेदार विश्वनाथ उगले, सुभेदार मारोती घुगे, भुसावळ आर्मी स्टेट हेडकाॅर्टरचे सुभेदार मेजर निरजकुमार, माजी सैनिक संघटना तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, चाळीसगाव जयहिंद सैनिक अॅकॅडमी सुभेदार पी. ए. पाटील तसेच आजी माजी सैनिक, नागरीक, महिला, नातेवाईक, तरुण मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.