गायछापचा वारसदार सांगून लावला लाखोंचा चुना, फेसबुकची मैत्री पडली महागात

0

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : एका महिलेला गायछाप कंपनीच्या मालकाचा मुलगा असल्याचे भासवून महिलेला व्यवसायाच्या बहाण्याने ९३ लाखांचा चुना लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. फेसबुकवरून मैत्री वाढवून ही फसवणूक करण्यात आली आहे.

सानपाडा येथे राहणाऱ्या जमुना वडगाये यांच्यासोबत हा प्रकार घडला असून, त्या बदलापूर नगरपरिषदेचे लेखा विभागातील सहायक संचालक प्रवीण वडगाये यांच्या पत्नी आहेत. २०१९ मध्ये त्यांची फेसबुकवर एका तरुणासोबत ओळख झाली होती. त्याने स्वतःचे नाव द्रिश मालपाणी असून, तो गायछाप कंपनीच्या मालकाचा मुलगा असल्याचे त्याने सांगितले होते.

त्यांच्यातली ओळख अधिक वाढल्यावर त्याने संपत्तीवरून वडिलांसोबत आपला वाद झाला असून, तो वेगळा राहत असल्याचे सांगितले. मात्र, आपण पुण्यात क्लब सुरू करणार असून त्यात पैसे गुंतवल्यास दोन वर्षांत दुप्पट रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून जमुना यांनी रोख व दागिन्यांची मोड करून ९३ लाख १६ हजार रुपये द्रिश या तरुणाला दिले.

व्यवहाराचा करार करण्याचे ठरले असतानाही तो रक्कम घेऊनही वेळोवेळी चालढकल करत होता. त्यानंतरही वडिलांसोबत संपत्तीवरून खटला सुरू असल्याचे सांगून, लवकरच पैसे परत करतो असे सांगून अधिक रकमेची मागणी करू लागला. त्यानंतर मात्र जमुना यांनी त्याच्याकडे पाठपुरावा केला असता, त्याने फेसबुक व मोबाइलवर ब्लॉक करून संपर्क तोडला.

आर्थिक परिस्थितीची घेतली माहिती

संगमनेर येथे जाऊन प्रत्यक्षात उद्योगपती मालपाणी यांच्याविषयी चौकशी केली असता, द्रिश नावाचा त्यांना कोणी मुलगा नसल्याचे समोर आले. शिवाय अनोळखी व्यक्तीने त्यांना मालपाणी यांचा मुलगा असल्याचे भासवून फसवणूक केल्याचेही उघड झाले.

यानुसार त्यांनी सानपाडा पोलिसांकडे तक्रार केली असता, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वडगाये यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती काढून संबंधिताने त्यांना हा गंडा घातल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.