लोकशाही विशेष लेख

मस्क यांचे ‘ट्रिलियनेर’ होणे हे आधुनिक मुक्त भांडवलशाहीचे सर्वात मोठे यश आणि त्याच वेळी तिची सर्वात मोठी मर्यादा अधोरेखित करते. या बदलत्या जागतिक अर्थकारणाचा वेध घेणारा हा विशेष लेख…
२१ व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्था आज एका अभूतपूर्व वळणावर उभी आहे. तंत्रज्ञानाचा वेगवान विस्तार आणि मुक्त बाजारपेठेमुळे संपत्ती निर्मितीचे नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. या आर्थिक शिखरावर उभी असलेली सध्याची सर्वात वादळी आणि सतत चर्चेत असणारी व्यक्ती म्हणजे इलॉन मस्क. मस्क हे आता केवळ जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक राहिलेले नाहीत, तर ते जगातील पहिले ‘ट्रिलियनेर’ (१ लाख कोटी डॉलर्स किंवा साधारणपणे ८५ लाख कोटी भारतीय रुपये संपत्तीचे धनी) बनण्याच्या उंबरठ्यावर आहेत. एकाच व्यक्तीकडे एवढी अफाट संपत्ती केंद्रित होणे ही केवळ एका यशस्वी उद्योजकाची वैयक्तिक यशोगाथा नाही. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून हा जागतिक भांडवलशाहीचा उदय, बाजारपेठेतील संभाव्य मक्तेदारी, करप्रणालीतील पळवाटा आणि संपत्तीच्या विषम वाटपाचा एक अत्यंत क्लिष्ट व गंभीर अभ्यासविषय आहे.
१. ‘कागदी संपत्ती’ आणि मूल्यांकनाचे अर्थशास्त्र : सर्वसाधारणपणे लोकांना वाटते की ‘ट्रिलियनेर’ होणे म्हणजे संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात १ लाख कोटी डॉलर्स रोख पडून असणे. परंतु, मस्क यांच्या संपत्तीचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे. ते समजून घेण्यासाठी आपल्याला अर्थशास्त्रातील ‘मूल्यांकन’ आणि ‘तरलता’ या दोन मूलभूत संकल्पना समजून घ्याव्या लागतील.
एखाद्या मालमत्तेची किंवा शेअर्सची बाजारातील आजची केवळ अंदाजित किंमत म्हणजे मूल्यांकन. हे मूल्य रोख पैशांच्या स्वरूपात नसते, तर ते बाजारपेठेतील मागणी, पुरवठा आणि भविष्यातील अपेक्षांवर ठरते. इलॉन मस्क यांची संपत्ती मुख्यत्वे टेस्ला आणि स्पेसएक्सच्या शेअर्सच्या किमतीवर आधारित आहे. शेअर्सच्या आजच्या किमतीवरून त्यांची एकूण संपत्ती मोजली जाते, ज्याला अर्थशास्त्रात ‘कागदी संपत्ती’ म्हणतात.
तरलता म्हणजे एखादी मालमत्ता किती वेगाने आणि सहजतेने ‘रोख पैशात’ रुपांतरित करता येते. अर्थशास्त्राचा नियम असा आहे की मूल्यांकन कधीही स्थिर नसते. उद्या जर टेस्लाच्या तंत्रज्ञानात काही त्रुटी निर्माण झाली, तर मस्क यांचे मूल्यांकन काही तासांतच अब्जावधी डॉलर्सनी खाली येईल. मस्क यांच्या कंपन्यांमधील गुंतवणूक ही भविष्यातील संभाव्य कामगिरीवर आधारित आहे. ही संपत्ती जोपर्यंत बाजारात विकली जात नाही, तोपर्यंत ती ‘अनरियलाईज्ड कॅपिटल गेन्स’ च्या स्वरूपात असते. त्यांनी एकाच वेळी सर्व शेअर्स विकण्याचा प्रयत्न केल्यास बाजारात घबराट निर्माण होऊन किमती कोसळतील. म्हणजेच, या संपत्तीत प्रचंड अस्थिरता आहे.
२. शुंपीटर यांचा ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ सिद्धांत आणि मस्क : प्रसिद्ध ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ जोसेफ शुंपीटर यांनी मांडलेला ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ (सर्जनात्मक विनाश) हा सिद्धांत मस्क यांच्या व्यावसायिक प्रवासाला तंतोतंत लागू होतो. शुंपीटर यांच्या मते, “जुने तंत्रज्ञान नष्ट करून त्यांची जागा पूर्णपणे नवीन आणि क्रांतिकारी तंत्रज्ञानाने घेणे म्हणजेच खरी आर्थिक प्रगती होय. ” मस्क यांनी नेमके हेच केले.
ऑटोमोबाईल क्षेत्र : खनिज तेलावर चालणाऱ्या वाहनांच्या उद्योगाला आव्हान देत त्यांनी ‘टेस्ला’च्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांचे साम्राज्य उभे केले.
अंतराळ क्षेत्र : ‘स्पैसएक्स’च्या माध्यमातून त्यांनी पुनर्वापर करता येण्याजोग्या रॉकेट्सची निर्मिती करून अंतराळ प्रवासाचा खर्च तब्बल ९० टक्क्यांनी कमी केला.
नॅचरल मोनोपॉली : ‘स्टारलिंक’द्वारे दुर्गम भागांत थेट उपग्रहाने इंटरनेट पोहोचवून दूरसंचार क्षेत्राची व्याख्या बदलली.
३. कल्याणकारी अर्थशास्त्र आणि विषमतेची दरी : मस्क यांच्या ट्रिलियनेर बनण्याला अर्थशास्त्राची दुसरी बाजू अत्यंत चिंतेची मानत आहे. ही बाजू ‘कल्याणकारी अर्थशास्त्र’ आणि ‘वितरणात्मक न्याय’ या संकल्पनांशी जोडलेली आहे.
जगातील आर्थिक विषमता मोजण्याचे मुख्य साधन असलेल्या ‘गिनी गुणांक’ मस्क यांच्यासारख्या मोजक्या व्यक्तींकडे संपत्ती केंद्रित झाल्यामुळे हा गुणांक धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. जेव्हा संपत्ती मोजक्या हातांत एकवटते, तेव्हा बाजारातील एकूण खरेदी क्षमता विस्कळीत होते. काही अर्थतज्ज्ञांच्या मते, मस्क यांची संपत्ती इतकी प्रचंड आहे की ते स्वतंत्रपणे जागतिक प्राधान्यक्रम बदलू शकतात. ज्या पैशांचा वापर पृथ्वीवरील गरिबी, उपासमार, आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण सुधारण्यासाठी होऊ शकला असता, तो पैसा मंगळावर मानवी वस्ती वसवण्यासारख्या अनिश्चित प्रकल्पांवर लावला जात आहे. याला अर्थशास्त्रात ‘संधी मूल्य’चे मोठे नुकसान मानले जाते.
४. करप्रणालीसमोरील आव्हान : ‘बाय, बॉरो, डाय’ धोरण : मस्क यांच्यासारख्या अब्जाधीशांच्या उदयाने जगातील प्रगत करप्रणालींच्या मर्यादा उघड्या पाडल्या आहेत. सध्याचे कर कायदे हे मुख्यत्वे ‘उत्पन्नावर’ आधारित आहेत. मस्क यांच्याकडे पगार नसतो, त्यांना कंपन्यांकडून केवळ शेअर्स मिळतात. त्यामुळे ते कायदेशीररित्या कर वाचवण्यासाठी एका विशेष चक्राचा वापर करतात, ज्याला अमेरिकन कॉर्पोरेट विश्वात “Buy, Borrow, Die” म्हटले जाते.
या पद्धतीत, मस्क आपले शेअर्स विकत नाहीत (ज्यामुळे टॅक्स वाचतो). त्याऐवजी, ते या वाढलेल्या मूल्याच्या शेअर्सच्या तारणावर बँकांकडून अत्यंत कमी व्याजाने अब्जावधी डॉलर्सचे कर्ज घेतात आणि आपला खर्च भागवतात. कर्जाच्या पैशांवर कोणताही कर नसतो. परिणामी, कर यंत्रणांना त्यांच्याकडून अतिशय नगण्य कर मिळतो. यावर उपाय म्हणून आता अनेक अर्थशास्त्रज्ञ थेट संपत्तीवर कर लावण्याची शिफारस करत आहेत.
५. ‘मस्क इकॉनॉमी’ आणि मक्तेदारीचा धोका : मस्क यांच्या संपत्तीचा प्रभाव आता केवळ त्यांच्या कंपन्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यांच्या सोशल मीडियावरील क्रिप्टो चलनांबद्दल केलेल्या विधानांमुळे या आभासी बाजारपेठेत अब्जावधी डॉलर्सची चढ-उतार झाली, ज्याला अर्थशास्त्रात ‘मार्केट मॅनिपुलेशन’ म्हणतात. तसेच, भविष्यातील ‘स्पेस इकॉनॉमी’ म्हणजेच अंतराळातील खाणकाम, सॅटेलाइट कम्युनिकेशन यावर मस्क यांची एकहाती मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार, अशी संपूर्ण मक्तेदारी निर्माण झाल्यास ग्राहकांचे शोषण वाढण्याचा धोका असतो.
इलॉन मस्क यांचे ‘ट्रिलियनेर’ होणे हे मानवी कल्पकता आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे प्रतीक नक्कीच आहे. परंतु, एकाच व्यक्तीच्या हातात एवढी प्रचंड आर्थिक सत्ता केंद्रित होणे हे निरोगी अर्थव्यवस्थेसाठी योग्य लक्षण नाही. मस्क यांच्यासारख्या ‘ट्रिलियनेर्स’च्या युगात प्रवेश करताना जागतिक स्तरावर करप्रणालीतील सुधारणा, मक्तेदारी विरोधी कायदे आणि संपत्तीचे योग्य पुनर्वितरण यांवर नव्याने धोरणात्मक विचार करावा लागेल. अन्यथा, ही अति-भांडवलशाही आर्थिक विषमतेचा असा ज्वालामुखी निर्माण करेल, जो भविष्यात कोणत्याही सरकारला नियंत्रणात आणणे शक्य होणार नाही.

लेखिका : प्राध्यापिका (अर्थशास्त्र)
मेल. drritashetiya14@gmai.com


