पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
जि.प. शाळेची आर्डर काढून देण्यासाठी आणि नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन जणांची तब्बल ८ लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र पांडुरंग दाभाडे (वय ४६, रा. पुनगाव रोड पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी गिरीष मंगलनाथ जोशी (रा. बालाजी मंदिराजवळ जय गुरुदेव व्यायाम शाळा पारोळा ता. पारोळा) याने राजेंद्र पांडुरंग दाभाडे यांचा पुतण्या रोहीत बापुसाहेब गाभाडे व साडूची मुलगी नुतन भारत पवार यांना नोकरी लावुन देण्याचे व जि.प. शाळेची आर्डर काढुन देण्याचे आमिष दाखवुन ७ लाख रुपये बँक खात्यावर व एक लाख रुपये रोख स्वरुपात घेवून उडवाउडवीची उत्तरे देवुन पुतण्या व साडुच्या मुलांची कोणतीही ऑर्डर काढून न देता व पैसेही परत दिले नाही.
राजेंद्र दाभाडे यांचा पुतण्या रोहीत बापुसाहेब दाभाडे, साडुची मुलगी नुतन पवार यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गिरीष मंगलनाथ जोशी याच्याविरुद्ध गु.र.न. ९८/२०२२ भादवी कलम ४२०,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.