ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने कृषी कंपनीच्या अधिकाऱ्याला ५ लाखांचा गंडा

0

ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने कृषी कंपनीच्या अधिकाऱ्याला ५ लाखांचा गंडा
 जळगाव व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे “हाय प्रॉफिट”चे आमिष दाखवत ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली एका कृषी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याची तब्बल ५ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीच्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशाबाबानगर येथील भागवत किसन पाटील (वय ६१) हे कृषीधन सीड्स प्रा. लि., जालना या कंपनीत सीनिअर अकाउंट एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत. १४ ऑगस्ट रोजी पाटील यांच्या व्हॉट्सअॅपवर ‘Wealth Index-K13’ नावाच्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये त्यांचा नंबर अचानक जोडला गेला. काही दिवस त्या ग्रुपमधील संदेश पाहिल्यानंतर ‘Assistant Annie’ नावाच्या व्यक्तीने गुंतवणुकीसाठी ५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंतच्या योजना सांगितल्या आणि नफ्यावर ५ टक्के कमिशन घेण्याचे आश्वासन दिले.

ठगांनी पाठवलेल्या लिंक्सवर क्लिक करून पाटील यांनी सुरुवातीला ५ हजार रुपये गुंतवले. काही वेळातच ९४२ रुपयांचा नफा दाखवण्यात आल्यानंतर त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर १८ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान त्यांनी क्यूआर कोड आणि एनईएफटीद्वारे विविध खात्यांमध्ये एकूण ५ लाख १४ हजार रुपये पाठवले. त्यांच्या प्रोफाइलवर ठगांनी तब्बल १३ लाख रुपयांचा नफा दाखवला होता.

मात्र, ४ ऑक्टोबर रोजी त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता खाते ब्लॉक झाले आणि रक्कम ट्रान्सफर होत नव्हती. त्यामुळे त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

सायबर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.