लोकशाही न्युज नेटवर्क
जळगाव ते पाचोरा रस्त्यावरील नांद्रा गावाजवळील एका वळणावर चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद तावडे यांचेसह ग्रामस्थांनी मदत कार्य करुन जखमी असलेल्या चालकास नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यास मृत घोषित केले.
अमित तायडे (वय – २५ वर्ष) रा. छत्रपती संभाजी नगर हे पत्नी व त्यांची १० वर्षाची भाची यांचेसह चारचाकी (क्रं. एम. एच. २० सी. एन. ९३३३) ने जळगावच्या दिशेने पाचोऱ्याकडे येत होते. दरम्यान पाचोरा तालुक्यातील नांद्रा गावानजीक बंधुराज हाॅटेल समोरील वळणावर अमित तायडे यांचे चारचाकी वरील नियंत्रण सुटले व चारचाकी थेट रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात अमित तायडे यांना गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच बंधुराज हाॅटेलचे संचालक तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद तावडे यांचेसह ग्रामस्थांनी मदत कार्य करत जखमींना नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता अमित तायडे यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांची पत्नी व सोबत असलेली अमित तायडे यांची भाची यांना किरकोळ दुखापत झाली असुन त्या दोन्ही सुखरुप आहेत. अमित तायडे यांचा गेल्या सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.

