माजी खासदार डॉ. जे. एम. वाघमारे काळाच्या पडद्याआड
लातूरच्या शैक्षणिक क्रांतीच्या शिल्पकाराचे ९१ व्या वर्षी निधन
लोकशाही न्यूज नेटवर्क
थोर विचारवंत, निष्ठावान साहित्यिक आणि लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचे शिल्पकार डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे निधन झाले. ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाघमारे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून त्यांनी विद्यापीठाचा पाया रचण्यात मोलाची भूमिका बजावली होती. केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर राजकारणातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता.
शिक्षण आणि साहित्याच्या क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. जनार्दन वाघमारे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला होता. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून पदवी (BA) घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एम.ए. पूर्ण केले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी.सह एल.एल.बी. आणि एल.एल.एम. सारख्या कायद्याच्या पदव्याही मिळवल्या. त्यांना पंजाबी विद्यापीठ, पटियाला तर्फे ‘डी.लिट’ ही सर्वोच्च पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते.
वाघमारे यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीत मराठवाड्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडले होते. ‘लातूर पॅटर्न’चे जनक मानले जाणाऱ्या डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर सामाजिक समता आणि शैक्षणिक गुणवत्तेचा ध्यास धरला. त्यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. शिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला, असा शोक मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
विद्वत्ता, तत्वनिष्ठ आणि, लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.