जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार..!

0

विशेष संपादकीय

तथाकथित घरकुल घोटाळा प्रकरणात (Gharkul scam case) अटकेत असलेले जळगाव जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन (Former Minister Suresh Dada Jain) यांना हायकोर्टाकडून (High Court) नियमित जामीन मिळाला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात विशेषता जळगाव (Jalgaon) व जिल्ह्यात जोरदार स्वागत होत आहे. जळगाव शहरात तर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गेल्या सात आठ वर्षापासून अनेक समस्यांनी जळगावकर (Jalgaonkar) नागरिक त्रस्त आहेत. जळगाव शहराची अवस्था बिकट आहे. शहराला कोणी वाली उरला नाही. अशा प्रसंगी जळगावकरांना पुन्हा सुरेश दादा जैन यांच्या नेतृत्वाची आठवण झाली, आणि सुरेश दादा जैन यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त आले. हा एक योगायोगच म्हणावा लागेल.

तब्बल 35 वर्षे जळगाव विधानसभा मतदारसंघातून नऊ वेळा निवडून आले. तीस वर्षे जळगाव नगर पालिकेवर त्यांनी अधिराज्य गाजवले. एक वादळी व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख. जनतेसाठी शंभर वेळा पक्ष बदलावा लागला तरी बदलणार, असे म्हणणाऱ्या सुरेशदादांच्या वक्तव्यातून जनते प्रती प्रेम निष्ठा हेच दिसून येते. धाडसी नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्यासारखे धाडसी निर्णय घेणारा नेता विरळच. देशात नगरपालिकेची 17 मजली प्रशासकीय इमारत असलेली जळगाव एकमेव नगरपालिका होय. नगरपालिकेचे उत्पन्न वाढले तरच नागरिकांना मूलभूत सुख सोयी पुरवू शकतो, शहराचा विकास होऊ शकतो, यासाठी व्यापारी संकुले उभारणाऱ्या जळगाव पालिकेच्या या संकुलांची पाहणी व अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील तसेच देशातील नगरपालिकांची मंडळी जळगाव येथे येऊन गेली. जळगाव नगरपालिकेचा आदर्श त्या मंडळींनी घेतला.

जळगाव शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्णय घेऊन झोपडपट्टीत राहणाऱ्याला सिमेंट काँक्रीटचे पक्के घरकुल मोफत देण्याचा निर्णय घोषित केला. झोपडपट्टीत राहणाऱ्यांना सिमेंट काँक्रीटच्या घरात राहण्याचे स्वप्न काही अंशी साकारलेही. नंतर सर्वच झोपडपट्टी धारकांना पक्के घरकुल देण्यासाठी मोठी योजना आखली. त्यासाठी कायद्याची अडचण आली गरिबांसाठी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन काम करण्याचे त्यांचे धाडस प्रतिस्पर्धी राजकारण्यांना अडचणीचे ठरू लागले. सुरेश दादांचे नेतृत्वाची राज्य नव्हे तर देशात चर्चा होऊ लागले.

गुजरातच्या भयानक भूकंपानंतर जळगाव जिल्ह्याच्या वतीने सुरेश दादांनी जे योगदान दिले त्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी यांनी दादांवर शब्दसुमने वाहिली. झपाट्याने सुरेश दादांच्या नेतृत्व बहरत असताना राजकारण आडवे आले आणि तथाकथित घरकुल घोटाळा प्रकरणी नियोजनबद्ध रीतीने त्यांना अडकविण्यात आले. 2012 पासून या प्रकरणाच्या न्यायालयीन लढ्यात सुरेश दादा अडकले त्यांना जामीन मिळू नये अशा प्रकारे प्रयत्न झाले. त्यामुळे तब्बल दहा वर्षे हा नेता राजकारणापासून दूर राहिला. त्यांना आता नियमित जामीन मिळाल्याने त्यांची जिल्ह्यात राहण्याच्या उपस्थितीने त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे.

घरकुल घोटाळा प्रकरणात सुरेश दादांना नियमित जामीन मिळाला असला, तरी त्यांना शिक्षा झाली असल्यामुळे ते प्रत्येक प्रत्यक्ष राजकीय निवडणूक लढवू शकणार नाहीत. तथापि त्यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. असे असले तरी सुरेश दादांचा जामीन जिल्ह्यातील त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि त्यांचे मिळणारे मार्गदर्शन यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. सुरेश दादा हे शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत. सध्या जळगाव महापालिकेवर (Jalgaon Mahanagarpalika) उद्धव ठाकरे गटाची सत्ता आहे. विद्यमान महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) हे सुरेश दादांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) हे शिंदे गटात (Shinde Group) असल्याने जळगाव महानगरपालिकेच्या महापौरांना विकास कामात सहकार्य मिळत नाही. सुरेश दादांचे मार्गदर्शन हे महापालिकेतील राजकारणाला कलाटणी देणारे ठरू शकते.

सुरेश दादांच्या आगमनामुळे जिल्ह्यातील अनेकांची विशेषतः शिवसेनेची बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या आमदारांची पंचायत होणार आहे. सुरेश दादांच्या जामीन वृत्ताने त्यांचे टेन्शन वाढणार आहे. एवढे मात्र निश्चित जळगाव जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला बळ मिळून जिल्ह्यात शिवसेना संघटनेला बळकटी मिळेल यात शंका घेण्याचे कारण नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील आगामी राजकारणावर सुरेश दादांचे नेतृत्व चर्चेत राहील. पुढच्या आठवड्यात सुरेश दादा जैन यांचे जळगावी आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे कार्यकर्ते चाहते मंडळी उत्सुक आहेत. त्यामुळे आता जळगावकरांना अच्छे दिन येतील अशी अपेक्षा करूया.

Leave A Reply

Your email address will not be published.