वढोदा वनक्षेत्रात १६ अतिक्रमण धारकांचे अनधिकृत झोपडे पाडले

वनविभागाची कारवाई

0

वढोदा वनक्षेत्रात १६ अतिक्रमण धारकांचे अनधिकृत झोपडे पाडले

वनविभागाची कारवाई

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताई-भवानी अभयारण्य अंतर्गत वढोदा वनक्षेत्रातील मोरझिरा नियतक्षेत्रात अतिक्रमणधारकांवर वनविभागाने धडक कारवाई केली. कक्ष क्रमांक ५६७ येथे अनधिकृत झोपड्या आणि अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. भारतीय वन अधिनियम १९२७ आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

वनविभागाने सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन आवश्यक दस्तऐवज सादर करण्याची संधी दिली होती. तसेच, स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, १६ अतिक्रमणधारकांनी प्रतिसाद न दिल्याने अखेर आज सकाळी ९.१५ ते दुपारी २ वाजेपर्यंत अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि मोठा फौजफाटा

ही कारवाई वनसंरक्षक निनू सोमराज धुळे, उपवनसंरक्षक प्रवीण ए. (जळगाव वनविभाग), सहाय्यक वनसंरक्षक यू. एम. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे (वडोदा), वनपरिक्षेत्र अधिकारी कृपाली शिंदे (मुक्ताईनगर) यांच्या नेतृत्वाखाली वनपाल भावना मराठे, गणेश गवळी, योगेश दीक्षित, दीपश्री जाधव, वंदना कोळी, वनरक्षक मोरे, कोळी, स्वप्नील गोसावी, गोकुळ गोसावी, दीपाली बेलदार, दीपाली शिर्के, रजनीकांत चव्हाण, उमेश तायडे, तुळशीराम घरजाले आणि SRPF टीम यांनी ही कारवाई पार पाडली.

मोरझिरा गावचे सरपंच, पोलिस पाटील आणि ग्रामस्थांनी वनविभागाला सहकार्य केले. अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी पुढील काळातही अशा कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा वनविभागाने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.