मंत्रिपदासाठी थयथयाट!

0

मन की बात

महायुतीमधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांत ज्यांना मंत्री होता आले नाही अशा नेत्यांची घालमेल होते आहे. आपण मंत्री झालो नाही, हे त्यांना सहन झालेले नाही. कोणी चिडून बोलत आहे, कुणी पक्षाच्या नेत्यावर नाराजी प्रकट करीत आहे, कुणी नागपूरच्या अधिवेशनाला न थांबता सरळ मतदारसंघातील आपल्या घरी निघून गेले, तर कुणी टीव्हीच्या कॅमेरापुढे आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना दिसत आहे. राज्यात यशवंतराव चव्हाणांपासून आज देवेंद्र फडणवीसांपर्यंत तीसपेक्षा जास्त सरकारे सत्तेवर आली. देवेंद्र फडणवीस यांनी तर मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. शरद पवार, वसंतदादा पाटील यांनीही चार-चार वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण गेल्या सहा दशकांत सरकार स्थापनेनंतर आपण मंत्री झालो नाही किंवा आपला पत्ता कापला गेला म्हणून कुणी एवढा थयथयाट केला नव्हता. आमदार म्हणून निवडून आलेल्या प्रत्येकाला मंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असणे यात गैर काहीच नाही, पण गेल्या सरकारमध्ये आपण मंत्री होतो म्हणून नव्या सरकारमधेही मंत्रिपद मिळालेच पाहिजे हा हट्ट आता वाढत चालला आहे. आमदार म्हणून निवडून आल्यावर मंत्रीपद मिळालेच पाहिजे, अशी महत्त्वाकांक्षा बळावत चालली आहे. महायुतीमध्ये प्रत्येकाला मंत्रिपद तर महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद खुणावत आहे. सत्तेचा सोपान गाठण्यासाठी आमदारांची कशी कसरत होत आहे हे उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. मला का मंत्री केले नाही, असा प्रश्न विचारत आमदार आदळआपट करीत आहेत.
भाजपा व मित्रपक्षांच्या मंत्र्यांच्या नावावर भाजपा हायकमांडचे शिक्कामोर्तब होणे गरजचे झाले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मित्रपक्षांच्या उमेदवारांना भाजपाने आक्षेप घेतल्यावर मित्रपक्षांना त्यांचे उमेदवार बदलावे लागले होते. आता नव्या सरकारमध्ये मंत्री कोण ठरवताना भाजपा हायकमांडची ‘नाहरकत’ घ्यावी लागली. आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून वगळलेले व डावललेले नेते उघड माथ्याने भोकाड पसरत आहेत. ज्यांना वगळले ते तूर्त काहीही करू शकत नाहीत, जे मिळवायचे ते भाजपा श्रेष्ठींच्या मर्जीनुसारच मिळणार आहे, याचे भान ठेवले पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील बारा मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये डच्चू मिळाला आहे. हे सर्वजण असंतुष्ट आहेत हे लपून राहिलेले नाही. सर्वात संतप्त झाले ते छगन भुजबळ. आजवर ते सात वेळा आमदार म्हणून निवडून आले. भुजबळ म्हणतात मला डावलल्याने मला काही फरक पडणार नाही, जरांगे पाटलांना अंगावर घेतले, त्याचे बक्षीस मिळाले ना. मी सामान्य कार्यकर्ता. मला डावलले काय नि फेकले काय, मला अजित पवारांशी बोलण्याची गरज वाटली नाही. मी म्हणजे काय खेळणे आहे का? माझे मंत्रीपद कुणी नाकारले हे शोधावे लागेल, असा भुजबळांचा संताप प्रकट झाल्यावर सोशल मीडियावरून धुवांधार प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात.
भाजपाचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांना सरकारमधून वगळल्याने ते खूप अस्वस्थ आहेत. विद्यार्थीदशेपासून ते संघ स्वयंसेवक, 1995 पासून भाजपामध्ये सक्रिय, संघटनेत विविध पदांवर काम केले, पक्षाचे प्रदेशाध्यक्षही झाले. मला मंत्रीपद देणार नाही, असे कुणीही सांगितले नव्हते. मंत्रीपद नाकारण्याचे कारण काय, याचा मी विचार करतोय, मी नाराज नाही. मनाविरुद्ध घडत असताना जो काम करतो तो कार्यकर्ता, असे ते सांगत त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र ते नाराज आहेत हे प्रकर्षाने जाणवते. महायुतीमध्ये नाराजांची यादी भलीमोठी आहे. आता या आमदारांनी नाराजी विसरून सरकारला साथ देणे यातच त्यांचे व त्यांच्या मतदारसंघाचे हित आहे. आदळ-आपट अशीच सुरु राहिली तर ती त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरु शकते. विकासासाठी हातात हात घालून काम करणे हेच हिताचे ठरले. नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

 

दीपक कुलकर्णी

वरिष्ठ उपसंपादक
9960210311

Leave A Reply

Your email address will not be published.