विधानपरिषद निवडणूक : शिवसेना युतीधर्म पाळणार
जळगाव : जळगावच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतला ‘युतीधर्म’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जागा भाजपाच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित मानले जात असताना, शिवसेनेनेही माघार घेण्याची तयारी दाखवल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. भाजपाकडून डॉ. केतकी पाटील यांचे नाव आघाडीवर असून, त्यांच्या उमेदवारीची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे.
भाजपामध्ये नंदू आडवाणी आणि डॉ. केतकी पाटील हे दोघे प्रमुख इच्छुक असले तरी, डॉ. केतकी पाटील यांचा वाढता जनसंपर्क आणि डॉ. उल्हास पाटील यांचे विविध पक्षांतील नेत्यांशी असलेला सुसंवाद हे त्यांच्या बाजूने जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अंतिम क्षणी भाजपाकडून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जळगावची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी स्थानिक आमदारांनी जोरदार आग्रह धरला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर महायुतीत तडजोडीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. शिवसेना या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारामागे ठामपणे उभी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अनिल चौधरींचे बंड शांत होणार!
दुसरीकडे, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनीही इच्छुक म्हणून हालचाली वाढवल्या आहेत. नगरसेवकांच्या भेटीगाठी, बैठका आणि संपर्क मोहिमेमुळे त्यांनी राजकीय वातावरण तापवले आहे. मात्र ते शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याने, वरिष्ठ नेते त्यांचे बंड थोपवून महायुतीचा उमेदवार एकमुखाने निवडण्याचा प्रयत्न करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकंदरीत, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच जळगावच्या राजकारणात पडद्यामागील हालचालींना वेग आला असून, महायुतीतला समन्वय आणि स्थानिक इच्छुकांची नाराजी या दोन्ही गोष्टी पुढील काही दिवसांत निर्णायक ठरणार आहेत.


