शेअर बाजारात आतषबाजी सुरूच

सेन्सेक्सची नवीन विक्रमाला गवसणी

0

मुंबई

भारतीय शेअर बाजारात आतिषबाजी सुरूच आहे. शेअर बाजार सातत्याने नवनवीन विक्रम करत असून आज शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन ऐतिहासिक शिखरावर मुसंडी मारली आहे. जागतिक बाजारात चढ-उतार होत असताना भारतीय शेअर मार्केटने जबरदस्त सुरुवात केली आणि तेजीत ओपनिंगनंतर नवीन शिखर गाठले.

शानदार तेजीच्या जोरावर बीएसई सेन्सेक्सने शुक्रवारी 80,893.51 अंकांच्या नवीन सर्वोच्च पातळीवर झेप घेतली तर, NSE निफ्टी 24,600 अंकांच्या दिशेने अग्रेसर असून निर्देशांकाचा नवीन ऐतिहासिक उच्च पातळी 24,592.20 अंक आहे. आयटी निर्देशांकातील जबरदस्त तेजीचा देशांतर्गत मार्केटला पाठिंबा मिळताना दिसत असून अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूकदारही खरेदी करत आहेत.

 

आयटी निर्देशांक सुसाट

आयटी निर्देशांक सध्या 3.58 टक्के मजबूत वाढीसह ट्रेंड करता असून 1,336 अंकांनी वाढून दिवसाचा हिरो ठरला. गुरुवारी, शेअर मार्केट बंद झाल्यावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील मोठ्या आयटी कंपनीने जून तिमाहीचे अपेक्षेनुसार निकाल जारी केले ज्याचा परिणामी शुक्रवारी टीसीएस स्टॉकवर दिसून आला आणि शेअर सेन्सेक्स-निफ्टी या दोन्हींमध्ये टॉप गेनर ठरला. टीसीएस सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांमध्ये 4.35 टक्के वाढीसह व्यवहार करत आहे. दरम्यान, सेन्सेक्समध्ये सूचिबद्ध कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे शेअर्स सर्वाधिक वधारले तर इन्फोसिस, ॲक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शेअर्समध्येही हिरवळ दिसत आहे. त्याचवेळी मारुती, एशियन पेंट्स, भारती एअरटेल आणि आयटीसी शेअर्स तोट्यात राहिले.

 

शेअर बाजारात तेजीचा वारू

बीएसईचे बाजार भांडवल 453.02 लाख कोटींच्या म्हणजे 5.42 ट्रिलियन यूएस डॉलर्सच्या ऐतिहासिक शिखरावर पोहोचले आहे. ओपनिंग सत्रात बीएसर्इ सेन्सेक्स 196.28 अंक किंवा 0.25 टक्के वाढीसह 80,093 अंकांवर उघडला तर NSE निफ्टी 72 अंक किंवा 0.30 टक्के वाढीसह 24,387 अंकांवर ओपन झाला. दुसरीकडे, आशियाई बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग नफ्यात तर चीनचा शांघाय कंपोझिट, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्केई तोट्यात राहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.