फटाका कारखान्यात भीषण स्फोट ; १७ कामगारांचा होरपळून मृत्यू
गुजरातमधील बनासकांठा येथील घटना
गांधीनगर वृत्तसंस्था
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील डीसा भागातील दीपक ट्रेडर्स फटाका कारखान्यात १ एप्रिल रोजी सकाळी भयावह स्फोट झाला. या दुर्घटनेत १७ कामगारांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कारखान्यात स्फोट झाला. स्फोटानंतर कारखान्यात प्रचंड आग पसरली आणि धुराचे लोट उठले.स्फोटामुळे भिंती व टिनची शेड कोसळून अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला.
अग्निशमन दल आणि SDRF पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. डीसा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांनी सांगितले की, स्फोटाचा तपास सुरू असून, कारखान्याचा मालक फरार आहे. या कारखान्याला अधिकृत परवाना होता का? याची चौकशी जिल्हाधिकारी माहिर पटेल यांच्या नेतृत्वाखाली केली जात आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे गुजरातभर हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.