चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठ व हनुमान नगर रोड (जुने वडाचे झाड परिसर) येथे वाढत्या जड वाहतुकीमुळे निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर प्रशासनाने अधिकृत पातळीवर हालचाल केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान अफजल रफीक खान यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, भद्रावती यांनी संबंधित विभागांना पत्राद्वारे आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
प्रसंगी दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात बाजारपेठ परिसरातील वाढती वाहतूक, नागरिकांची मोठ्या प्रमाणातील वर्दळ आणि त्यात जड वाहनांची सर्रास ये-जा यामुळे अपघाताचा संभाव्य धोका निर्माण होत असल्याची बाब मांडण्यात आली होती. विशेषतः सकाळ व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत हायवा व दहा चाकी वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली होती.

या संदर्भातील वृत्त दैनिक लोकशाहीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भद्रावती यांना वाहतूक नियोजनाबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. संबंधित विभागांनी परिस्थितीचा आढावा घेऊन गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर नियंत्रण ठेवावे व वाहतूक सुरळीत राखावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सदर पत्रात कोणतीही सरसकट बंदी जाहीर करण्यात आलेली नसली तरी शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत समन्वयाने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या घडामोडीमुळे व्यापारी, ग्राहक व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, प्रशासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची भावना शहरातून व्यक्त होत आहे.

