अंतुर्ली-रंजाणे परिसरात चार ते पाच जनावरांवर हल्ले; वनविभागाच्या पथकाला यश
अमळनेर : तालुक्यातील अंतुर्ली-रंजाणे परिसरासह विविध गावांमध्ये दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला आहे. १६ ऑक्टोबर रोजी पहाटे तांबेपुरा-अंतुर्ली रस्त्यावरील पिंजारी मुस्लिम कब्रस्तान परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. या बिबट्याने परिसरात चार ते पाच जनावरांवर हल्ले करून त्यांना फस्त केल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शिरूड, मंगरूळ, पिंपळे, ढेकू रस्ता, धार रस्ता, अंतुर्ली-रंजाणे, ताडेपुरा आणि टाकरखेडा परिसरात बिबट्याचा वावर आढळून येत होता. त्यामुळे वनविभागाकडून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते.
वनपरिक्षेत्र अधिकारी छत्रपती चव्हाण, उपवनसंरक्षक राम धोत्रे आणि सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गुलाब पिंजारी, वनरक्षक दुर्गादास वानखेडे, योगेश पाटील, मनीषा मोरे तसेच वनमजूर प्रवीण पाटील, समाधान पाटील आणि मयूर पाटील यांनी बिबट्याला पकडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पथकाकडून दररोज गस्त घालून बिबट्याच्या वावरानुसार पिंजऱ्यांची जागा बदलण्यात येत होती. बिबट्याला पिंजऱ्यात आकर्षित करण्यासाठी माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांनी शेळ्या उपलब्ध करून दिल्या, तर सरपंच सचिन पाटील यांनीही वनविभागाला सहकार्य केले.
बिबट्याचा वावर वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने वनपाल गुलाब पिंजारी हे आपल्या कर्मचाऱ्यांसह रात्री उशिरापर्यंत आणि पहाटेच्या वेळी गस्त घालत होते. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, १६ ऑक्टोबर रोजी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला.
बिबट्या पकडल्याची माहिती मिळताच वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आता या बिबट्याला पुढे कुठे सोडायचे, याबाबत वरिष्ठ अधिकारी निर्णय घेणार आहेत. बिबट्या पकडला गेल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

