लोहारा ता. पाचोरा

मातृत्वाचे हृदयस्पर्शी दर्शन घडविणारी घटना लोहारा येथे घडली. कुत्र्यांच्या हल्ल्यात अडकलेल्या आपल्या पिल्लाला वाचविण्यासाठी धावलेल्या एका वानरीचा मृत्यू झाला, तर पिल्लू गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवत मृत वानरीवर दफनविधी केला, तर जखमी पिल्लाला उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
लोहारा गावात अन्न, पाणी व आश्रयाच्या शोधात वानरांचा कळप गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास आहे. या कळपातील एक लहान पिल्लू गावातील महादेव मंदिर परिसरातील पिंपळाच्या झाडावरून खाली आले. त्याचवेळी भटक्या कुत्र्यांच्या कळपाने त्या पिल्लावर हल्ला चढविला.
आपल्या पिल्लाला वाचविण्यासाठी माता वानरी तात्काळ धावून आली. मात्र, कुत्र्यांच्या कळपाने तिच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात वानरीचा जागीच मृत्यू झाला, तर पिल्लू गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनमजूर चंद्रकांत कोळी यांना कळविले. त्यांनी जखमी पिल्लाला तातडीने स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन प्रथमोपचार करून घेतले. त्यानंतर पुढील उपचार व देखभालीसाठी पिल्लाला पाचोरा येथील वनविभागाच्या सुश्रुषा केंद्रात दाखल करण्यात आले.
दरम्यान, ग्रामस्थांनी पुढाकार घेत मृत वानरीवर दफनविधी केला. या घटनेतून प्राणिमात्रांविषयीची संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शन घडल्याची भावना परिसरात व्यक्त करण्यात येत आहे.


