लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला/ इलायची’चा प्रचार केल्याबद्दल या तिघांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. 2024 मध्ये विमल या पान मसाला कंपनीच्या जाहिरातीसाठी हे तीन अभिनेते एकत्र आले होते. या तिघांना ‘विमल पान मसाला/ इलायची’च्या जाहिरातीतील सहभाग तात्काळ थांबवण्याचे आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल, वेबसाइटवरून जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल मजकूर काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कलाकारांवर कायदेशीर कारवाई का करू नये, याचं सविस्तर लेखी स्पष्टीकरण 15 दिवसांच्या आत सादर करण्यास सांगितलं आहे.
एफडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून तुकाराम मुंढे हे धडक कारवाई करत आहेत. राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्रीवरही एफडीएनं अनेक ठिकाणी छापे टाकले होते. तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या गुटखा आणि पान मसाल्यावर एफडीएनं कारवाई तीव्र केल्यामुळे शाहरुख, अजय देवगण आणि टायगर हे चौकशीच्या कक्षेत आले आहेत. या तिघांनी मिळून केलेल्या जाहिरातीमुळे विमल पान मसाला ब्रँडशी संबंध निर्माण होतो आणि हे त्याचं अप्रत्यक्ष प्रमोशन ठरू शकतं, असं एफडीएनं या नोटिशीत नमूद केलं आहे. या नोटिसा अजय देवगणच्या जुहू इथल्या निवासस्थानी, शाहरुख खानच्या वांद्रे इथल्या मन्नत या निवासस्थानी आणि टायगरला त्याच्या टायगर श्रॉफ प्रॉडक्शन्स एलएलपी या प्रॉडक्शन हाऊसच्या ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत.
एफडीएच्या म्हणण्यानुसार, जाहिरातीचं सादरीकरण, संवाद, उत्पादनाचं नाव यांमुळे तिन्ही कलाकार ज्या उत्पादनाचा प्रचार करत आहेत, ती तंबाखूशी संबंधित प्रतिबंधित उत्पादनाची अप्रत्यक्ष किंवा पर्यायी जाहिरात आहे का, याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतो. ‘संबंधित जाहिरातीची तपासणी केली असता, ही जाहिरात ‘विमल’ या ब्रँडचा प्रचार करते, असं प्रथमदर्शनी दिसून येतं. हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाला या उत्पादनाशी संबंधित आहे. महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी FSS कायदा, 2006 च्या कलम 30 (2)(अ) अन्वये 13 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या बंदी आदेशात नमूद केल्यानुसार, या उत्पादनाच्या निर्मिती, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एका वर्षाच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे’, असंही एफडीएच्या नोटीसमध्ये नमूक केलं आहे.


