लोकशाही न्यूज नेटवर्क

पश्चिम बंगालमधील राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला आहे. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा करण्यात आला आहे. रविवारी ३१ मे रोजी हुगळी जिल्ह्यातील चंडीतला पोलीस ठाण्याबाहेर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण बॅनर्जी हे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यासाठी चंडीतला पोलीस ठाण्याकडे जात होते. याच वेळी काही लोकांनी त्यांच्यावर दगडासारखी किंवा चेंडूसारखी वस्तू फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर माध्यमांशी बोलताना कल्याण बॅनर्जी यांनी थेट भाजपावर निशाणा साधला. “भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्या दिशेने दगडसारखी वस्तू फेकली. एका नेत्यावर हल्ला करणे ही गंभीर बाब आहे,” असे ते म्हणाले. या प्रकारामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच बिघडत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर आता कल्याण बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यामुळे टीएमसीने भाजपावर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या टीएमसी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेसाठी निवेदन देण्यासाठीच कल्याण बॅनर्जी पोलीस ठाण्यात जात होते. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा वेग आला असून, पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.


