अधिकारी नसल्याने अनेक प्रकरणे रखडली : नागरिक त्रस्त
गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात माजी पालकमंत्र्यांचे उपोषण
पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात माजी पालकमंत्री सतिश पाटील यांनी पारोळा पंचायत समितीच्या आवारात उपोषणाला सुरुवात केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथील गटविकास अधिकारी किशोर शिंदे हे मागील अनेक दिवसांपासून रजेवर आहेत. यामुळे तालुक्यातील अनेक कामे प्रलंबित आहेत. तसेच लवकरच महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने तसेच आचारसंहिता लागु होण्यापुर्वी तालुक्यातील रखडलेले प्रकरणे त्वरित मार्गी लावण्यासाठी यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी पारोळा तहसीलदार डॉ उल्हासराव देवरे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
गटविकास अधिकारी १५ दिवसापासून रजेवर
पारोळा पंचायत समितीत मागील काही दिवसांपासून काही अधिकार्यांवर व कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत विभागाने कार्यवाही केल्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून पंचायत समिती गटविकास अधिकारी किशोर शिंदे हे रजेवर आहेत. माजी पालकमंत्री सतिश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष दुरध्वनीवरून मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्याशी बोलणे झाल्यानंतर एकदा शिंदे हे कामावर आले. त्यानंतर ते रजेवर निघुन गेले. तालुक्यातील अनेक प्रकरणे रखडले आहेत. तेथे अधिकारी नसल्याने किंवा कोणालाही चार्ज दिलेला नसल्याने लोकांची कामे होत नाही. ४-५ दिवसांत आचारसंहिता लागू शकते. त्यावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी या अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार डॉ उल्हासराव देवरे यांना देण्यात आले.
याप्रसंगी माजी पालकमंत्री सतिश पाटील यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामीण भागातील नागरिक यांनी सामुहिक उपोषणाला सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आले.