लोकाध्यात्म विशेष
श्रावण महिन्यात व एकूणच चातुर्मासात येणारे व्रत, वैकल्य, उपवास हे संयमाचे स्तोत्र आपल्या जीवनात अनुसरणे असे त्याचे प्रयोजन आहे. आपण सर्वचजण आपापल्या कुलधर्मानुसार व प्रांतानुसार त्याचे आचरण करीत असतो. भक्तीभावान व श्रद्धायुक्त अंतःकरणांने मोठ्या प्रमाणात उपवास केला जातो उपवास हे एक प्रमुख व अविभाज्य अंग बनून जाते.
याच पवित्र व मंगल अशा श्रावण मासात पावसचे नाथ संप्रदाय स्वामी स्वरूपानंद यांची 15 ऑगस्टला पुण्यतिथी आहे. त्यांचे स्मरण अतिशय पुण्यप्रद व आत्मउन्नतीच्या मार्गावर आपल्याला दीपस्तंभासारखे आहे. ‘उपवास’ या पार्श्वभूमीवर त्यांच्या संजीवनी-गाथा या अभंग संग्रहातील अभंगाचा थोडा आढावा आपण घेणार आहोत. त्या दिवशी थोडं प्रकटचिंतन त्यांनी मांडलेले विचार याचा अभ्यास करणार आहोत.
उपासनेतील किंवा साधनेतील अगदी पहिली प्राथमिक पायरी म्हणजे ‘उपवास’ आहे. उपवास हा व्यापक शब्द आहे तो शारीरिक, मानसिक व वाचिक तिन्ही स्तरावर घडावा लागतो. उपवास म्हणजे साबुदान्याची खिचडी व बटाट्याचे वेफर्स इतपत मर्यादित नाही. उपवासात पचायला हलके पदार्थ सेवन करणे अभिप्रेत आहे. भगवंता जवळ ‘वास’ अभिप्रेत आहे. भगवंताचे नामस्मरण, ध्यान, चिंतन, मनन, स्तोत्रपठण यासाठी वेळ मिळावा लागतो. स्वामी स्वरूपानंद आपल्या अभंगात अतिशय सुंदर सुस्पष्ट व कालाशी सुसंगत असे मार्गदर्शन आपल्याला करीत आहेत ते म्हणतात, “नको निराहार, नको सेवू फार” खूप पोटास तड लागेल इतके भोजन नको किंवा अशक्तपणा येईल इतके कमीही भोजन नको. एकदम निर्जली उपवास नको. टोकाचा दंड शरीराला देऊ नको. तामस आहार मात्र घेऊ नकोस. जेणेकरून भगवंताकडे जाण्याचा मार्ग सुकर होईल
“नको बोलू फार,नको धरू मौन” तू फार वृथा बडबड करू नको पण व्यवहारासाठी तुला बोलावेच लागेल. व्यवसायाच्या ठिकाणी बोलणे अपरिहार्य आहे. शिक्षक असेल तर अधिक बोलावे लागणार. वकील असेल तर मुद्देसुद बोलावे लागणार. वैद्यकीय पेशात असेल तर बोलण्यापेक्षा हाताला गुण अधिक लागतो. आज जेवायला काय करणार? या प्रश्नाला उत्तर द्यावेच लागणार.
पण वृथा वादविवाद, तर्कवितर्क, भूत-भविष्याचे अंदाज, अहंकार किंवा बोलण्यातून येणारी प्रौढी ही नको. 24 तासातील दोन तास तरी मौन हवे कारण बोलण्यात विलक्षण शक्ती वाया जाते. पण याचा अर्थ तारतम्याने घ्यावा कारण संसारातील सुख संवादावर अवलंबून असतात.
“आपणासं चिमटा घेतला तेणे जीव कासावीस झाला”
“आत्मवत परावे ते मानत जावे” असे रामदास स्वामींनी बजावले आहे. बोलताना जबाबदारीने बोलावे. सुमधुर संभाषण प्रयत्नपूर्वक करावे लागते.
दिवसभर गादीवर लोळत राहणे योग्य नाही व अति जागरणही बरोबर नाही. रात्रीच्या नाटकाचा प्रयोग पाहिला किंवा सिनेमाचा शो तर उठायला उशीर होणार. अति जागरणाने प्रकृतीही बिघडते म्हणून सात तास झोपेला योग्य तो मान द्यायलाच हवा.
एकूणच प्रयत्न सर्वांगाने हवेत. कंदीलाची काच स्वच्छ असेल तर आतून पडणारा प्रकाशही तितका स्वच्छ पडतो. तसेच आपल्याला पवित्र ज्ञान हवे असेल तर आपली तिन्ही साधन देह-मन- बुद्धी स्वच्छ हवीत. देह निर्मळ हवा, मन विकार रहित हवे, बुद्धी अग्र व निश्चयाची हवी.
‘खाना,पिना, मजा करना’ हेच जीवनाचे तत्त्वज्ञान असेल तर विषय तेथेच थांबतो. पण नरदेह मोठ्या भाग्याने भेटला आहे या समर्थ विचारांशी आपण सहमत असलो तर विवेक येणारच व विवेकानं विचार झाला की आचार योग्य घडणार हे सूत्र बरोबर जमते.
आहार सुद्धा केवळ जिभेचा नसतो. कानाने काय ऐकायचे, डोळ्याने काय पाहायचे, मनाने कसा विचार करायचा हे ठरवावे लागते आणि अखेरीस संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात तसे,
“डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख” “तुम्ही आईकाजी कान विठोबाचे गुणगाणं” व “शेवटी मना तेथे धाव घेई राही विठोबाच्या पायी”
हा खरा परमार्थ व खरं अध्यात्म हे लक्षात असू द्यावे. भगवद्गीतेतही
“युक्तआहारविहारस्य युक्तचेष्ट्यस् कर्मसु”
“युक्तस्वप्नावबोधस्य योगो भक्ती दुःखहा”
सहाव्या अध्यायात हे वचन आले आहे. भगवंत सांगतात, ज्याचा आहार नियमित संयमित आहे जो अति जागरण करत नाही अति झोप घेत नाही जो खादाड नाही व भुकेने व्याकुळही नाही ज्याचे चित्त ताब्यात आहे त्याला योग साधतो.
म्हणजे हा योग संसारी माणसाला जमणारच नाही त्याच्या वाट्याला आपण जाऊच नाही असे नाही. कुठेही हिमालयात जायचे व एक पायावर उभे राहायचे असे तप हे निश्चित नाही.
स्वामी स्वरूपानंद यांनी तर आपल्याला या अभंगात छोटे-छोटे जणू कानमंत्र दिलेत. ते सुलभ व सोपे आहेत. उपवासाचा सर्वांगाने विचार व एक वेगळा दृष्टिकोन घेऊन व्रत उपवास साजरे केले तर “संयमी जीवन बाणता सहज”
“स्वामी म्हणे तुज योगसिद्धी”
आणि या योगाचे बळ एवढे आहे की सर्वसृष्टी प्राणी मात्र हरीमय दिसू लागतात.
असे हे उपवासाचे व्रत वैकल्य केवळ चातुर्मासा पुरते मर्यादित न राहता वर्षभर त्यांचे पालन झाले तर मणि-कांचन योगच ठरेल.
मन व इंद्रियावर ताबा मिळवून स्वतःवर विजय मिळविणे हा खरा योग आहे व श्रद्धायुक्त व भक्ती युक्त अंतकरणाने तो लवकर साधतो. माणूस स्वतः स्वतःचा मित्र असतो व स्वतः स्वतःचा शत्रू असतो. त्यामुळे गती किंवा त्याची अधोगती त्याच्या हातातच असते हे सूज्ञांस सांगावे लागत नाही. असा योग आचरण करून स्वामी स्वरूपानंदाच्या अभंगातून उद्गार आले की,
“स्वामी माझा नाथसंप्रदाय”
“अवघे हरिमय योग बळे”
या चातुर्मासात त्या दृष्टीने थोडा प्रयत्न आपणही करूया व त्यांच्या पावन चरणांना वंदन करूया.
हरी ओम्
लेखिका – भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.
