खरेदी बंद तरीही शेतकऱ्यांची वाहने अद्याप नाफेड केंद्राबाहेर
गर्दी वाढली मात्र केंद्र चालकांकडुन उपाययोजनांचा अभाव
लोकशाही न्यूज नेटवर्क
हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी नाफेड अंतर्गत शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. या केंद्रांवरील खरेदी बंद झाली असून येथे नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनने भरलेल्या वाहने अजूनही नाफेडच्या खरेदी केंद्राबाहेर उभी आहेत. याठिकाणी सोयाबीन भरलेल्या वाहनांची तीन किलोमीटर लांब रांगा लागलेल्या पाहण्यास मिळत आहेत.
बीड जिल्ह्यातील माजलगांव येथील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. वेळेवर माप व्हावे, यासाठी गर्दी वाढत असतांना मात्र केंद्र चालकाकडुन कसल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना आठ दिवसांपासून बसण्याची वेळ येत आहे. नाफेडच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत.
माजलगाव तालुक्यातील हरभरा, सोयाबीन व इतर धान्य उत्पादक शेतकऱ्यांकरीता एकच शासकीय खरेदी केंद्र तसेच एकच खरेदी केंद्र आहे. त्यातही बारदाण्या अभावी अथवा कुल्याही कारणांमुळे नेहमीच बंद असल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नोंदणी करून महिना उलटला तरी देखील अनेकांना मॅसेज न आल्याने सोयाबीन खरेदी केंद्रावर आणता आले नाही. शेतकऱ्यांना इतर कामे सोडुन शासकीय खरेदी केंद्रावर मुक्काम करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.