शेतकरी आंदोलन चिघळले; आ.चंद्रकांत पाटील यांना अटक व सुटका
राष्ट्रीय महामार्गासाठी भूमी अधिग्रहणात घोळ : मुक्ताईनगर बंद
मुक्ताईनगर : पुरनाड फाटा येथे येथील राष्ट्रीय महामार्गाच्या मोबदल्यावरून गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन अखेर तीव्र स्वरूपात पेटले असून, या आंदोलनादरम्यान मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परिणामी मुक्ताईनगर व कुऱ्हा शहरांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला आहे.
सध्या सुरू असलेल्या इंदूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी खामखेडा व परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येत आहेत. मात्र या जमिनींच्या मोबदल्यामध्ये प्रचंड अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी सातत्याने करत असून, शासनाकडून त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापूर्वीही महामार्गाच्या ठेकेदाराने शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांमध्ये जेसीबी घालून पिकांचे नुकसान करत बळजबरीने काम सुरू केल्याने आंदोलन पेटले होते. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी जलसमाधीचा इशाराही दिला होता.
आज खामखेडा येथे पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन छेडले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील स्वत: शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आंदोलनस्थळी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणा देत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. मात्र काही वेळातच वातावरण चिघळले आणि पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांना पुढील कारवाईसाठी भुसावळ पोलीस ठाण्यात हलवण्यात आले आहे. या आंदोलनाप्रसंगी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी, मुक्ताईनगर येथील पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, तहसीलदार गिरीश वखारे यांच्यासह पोलीस कर्मचारी व महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात मोठा फौजफाटा
या अटकेची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि मुक्ताईनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी व शिवसेनेच्या वतीने शहर बंदची हाक देण्यात आली, ज्याला व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. त्यामुळे मुक्ताईनगर आणि कुर्हा परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरभर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना आंदोलक शेतकऱ्यांनी प्रशासनावर सुलतानी व आडमुठेपणाचा आरोप करत, कवडीमोल मोबदल्यात जमीन हडपण्याचा प्रयत्न चालू असल्याची तीव्र टीका केली. वर्षभर चाललेल्या आंदोलनाची सरकारकडून दखल न घेतल्याने शेवटी आमदारांनाही आंदोलनात सहभागी व्हावे लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. पोलिसांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारा आहे, असे मतही व्यक्त करण्यात आले.