लासगाव ता. पाचोरा
नांद्रा परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास गुरुवारी सुरुवात झाली. महसूल विभागाच्या ग्राम महसूल अधिकारी वर्षा काकुसते तसेच माजी सरपंच तथा शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांद्रा शिवारातील शेतांवर प्रत्यक्ष पाहणी करून कापूस, ज्वारी, सोयाबीन, मका आदी पिकांचे पंचनामे करण्यात आले.

पावसाचा परिणाम तसेच पिकांची झालेली वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल विभागाने प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते सागर तावडे, सोपान पाटील, पोलिस पाटील भूषण पाटील, दोधू पाटील, जगदीश पाटील, शंकर पाटील , गंभीर पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लवकर नुकसान भरपाई मिळावी
“नांद्रा शिवारातील वाढ खुंटलेल्या ज्वारी, बाजरीच्या काढणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असताना काढणीसाठी शेतकऱ्यांना घरातून मजुरीचे पैसे खर्च करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी.” अशी मागणी होत आहे.

