पाचोरा : पाणीटंचाई आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर फळबागांचे संरक्षण व उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी हवामान अनुकूल कृषी (सीआरए) तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा बुद्रुक येथे सोमवारी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मोसंबी उत्पादक शेतकरी सुनील संतोष पाटील यांच्या शेतात प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सीआरए तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना या तंत्रज्ञानाचे फायदे, अंमलबजावणीची पद्धत आणि पाणी बचतीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी यू. आर. जाधव यांनी केले. यावेळी उपकृषी अधिकारी खिंडार, सहाय्यक कृषी अधिकारी रविंद्र पाटील तसेच गोराडखेडा बुद्रुकचे सहाय्यक कृषी अधिकारी जय वाघ उपस्थित होते. कार्यक्रमास परिसरातील फळबाग उत्पादक, ज्येष्ठ शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
काय आहे सीआरए तंत्रज्ञान?
सीआरए (क्लायमेट रेसिलियंट अॅग्रिकल्चर) म्हणजे हवामानातील बदल, अनियमित पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी विकसित करण्यात आलेली आधुनिक कृषी पद्धती. या तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यातही फळझाडांची मुळे मजबूत राहून झाडांच्या वाढीस चालना मिळते.
पाणी बचतीसह उत्पादनात वाढ
या पद्धतीत झाडांच्या मुळांच्या परिघात थेट पाणी व पोषणद्रव्ये पुरवली जातात. त्यामुळे बाष्पीभवन कमी होते आणि पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. दुष्काळी परिस्थितीतही रोपे व कलमे तग धरतात तसेच झाडांची वाढ अधिक जोमाने होते.
अशी केली जाते अंमलबजावणी
फळझाड लागवडीसाठी दोन बाय दोन फूट आकाराचा खड्डा तयार केला जातो. खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांत तीन ते चार इंच व्यासाचे आणि सुमारे तीन फूट लांबीचे पीव्हीसी पाईप उभे बसवले जातात. त्यानंतर खड्डा माती, शेणखत आणि वाळूच्या मिश्रणाने भरला जातो.पाणी आणि खते थेट या पाईपमधून मुळांपर्यंत पोहोचवली जातात. पाईपमध्ये वाळू भरल्यामुळे ते बंद पडत नाहीत आणि मुळांना आवश्यक हवा मिळण्यासही मदत होते.
आवश्यक साहित्य
या तंत्रज्ञानासाठी तीन ते चार इंच व्यासाचे पीव्हीसी पाईप, वाळू किंवा रेती, चांगले कुजलेले शेणखत अथवा गांडूळ खत यांची आवश्यकता असते.हवामान बदलाच्या आव्हानांमध्ये पाणी बचत करत फळबागांचे संवर्धन करण्यासाठी सीआरए तंत्रज्ञान प्रभावी ठरत असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

