लोकशाही न्यूज नेटवर्क
भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कवलेवाडा परिसरात वाघानं हल्ला केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर भंडाऱ्याच्या कवलेवाडा परिसरात नागरिक संतप्त झाले होते. यामुळे परिसरात हिंसक वळण आले होते. यावेळी नागरिकांनी वनविभागाच्या गाड्यांची तोडफोड करत वाहन पेटवून दिली होती.
भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कवलेवाडा येथील नंदा किसन खंडाते (वय ५०) असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे. दरम्यान वाघाने हल्ला करत ठार केल्यानंतर वाघाने यांच्या मृतदेहाजवळ ठाण मांडला होता. ग्रामस्थांनी त्याला दगड आणि काठ्या मारून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघ तेथून गेला नाही. अखेर वाघांने महिलेच्या मृतदेहाजवळचं ठिय्या मांडल्यानं याची माहिती वनाधिकारी आणि पोलीस विभागाला दिली.
मात्र, वन विभागाचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचले नाही; असा आरोप करीत शेकडोंच्या संख्येतील संतप्त ग्रामवासीयांनी घटनास्थळावर पोहोचलेल्या १० ते १५ वन कर्मचाऱ्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा रोष बघता वन कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवत सैरावरा पळाले. यानंतर या प्रकरणाला हिंसक वळण लागलं आणि संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या वाहनाची तोडफोड करून वाहन पेटवून दिलं.
रात्री उशिरा मृत महिलेच्या मृतदेहाजवळ ठाण मांडून बसलेल्या वाघाला डॉट मारून बेशुद्ध करून त्याला जेरबंद केलं. यावेळी संतप्त ग्रामवासीयांनी महिलेचा मृतदेह जेरबंद केलेल्या वाघाच्या पिंजऱ्यासमोर ठेवत मृतक महिलेच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी या मागणीला घेऊन आंदोलन केलं. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि खासदार प्रशांत पडोळे यांनी नागरिकांची समजूत काढत रात्री उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आणि जेरबंद केलेल्या वाघावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी नेण्यात आलं.