धर्माबाद (गिरमाजी सुर्यकार), लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो संकटात असेल तेव्हा त्याला आधार देऊन उभे करणे हे सरकारचे काम आहे. कारण शेतकरी जगला तर जग जगेल. निसर्गाने मारल्यावर सरकारने तारले पाहिजे; पण शेतकऱ्यांच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. शेतकऱ्याला आपण बळीराजा म्हणतो; पण तो राजा राहिला नसून त्याचा दररोज बळी जात आहे. सर्वांचे पोट भरतो म्हणून त्याला आपण अन्नदाताही म्हणतो; पण त्याच्यावरच उपाशी राहण्याची वेळ नेहमीच येत आहे. शेतकऱ्यांचे दुःख, व्यथा, समस्या कधीच संपत नाहीत. निसर्गाचा लहरीपणा तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. कधी चांगले पीक आले तर बाजारात भाव नसतो. बाजारात भाव असला, तर उत्पन्न येत नाही.
दुष्काळ, अवकाळी, गारपीट या संकटानेही त्याला घेरले आहे. नैसर्गिक संकटे कमी की काय म्हणून, सरकारी धोरणांनी शेतकऱ्यांचा छळ मांडलेला आहे. शेती करणे आता परवडत नाही. खते, बियाणे, कीटकनाशके, डिझेल, शेतीला लागणारे साहित्य आता महागाईमुळे शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
मायबाप सरकारची तर बातच निराळी. प्रत्येक मंत्री, नेता मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, असेच म्हणतो; पण त्याला खुर्चीवर बसल्यावर त्यांच्या व्यथा मात्र दिसत नाहीत. आजही केंद्रात व राज्यात जे सरकार आहे ते केवळ शेतकऱ्यांच्या नावाने भरमसाट घोषणा करत असते. कर्जमाफी असो वा अनुदान असो केवळ घोषणाबाजी सुरू आहे. आपणच शेतकऱ्यांचे कैवारी आहोत, हे दाखवण्यासाठी कोट्यवधी रुपये जाहिरातबाजीवर उधळायचे; पण शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली की टाळाटाळ करायची.
या वर्षी पावसाने ओढ दिली. कमी पाऊस झाला. खरीप वाया गेला. पिके शेतातच करपून गेली. आता रब्बीही हातातून गेल्यातच जमा आहे. कमी पाऊस झाल्यामुळे रब्बीचा पेरा खूपच कमी झाला असून गहू, हरभरा, तूर, मका, ज्वारीचीही पेरणी फार कमी झाली आहे. खरीप आणि रब्बीत चालणारी तूरही पाण्याअभावी सुकत चालली आहे. जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचेही पीक हाती येण्याची चिन्हे दिसत नाहीत.
खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, कपाशी, मुगाचे पीक उभे दिसत होते. हिरवेगार शेत पाहून शेतकरी सुखावला होता; पण पावसाने दगा दिला. सोयाबीन सोंगणीला आले. मजूर लावून सोंगणी केली; पण थ्रेशरने सोयाबीनचे खळे झाले तेव्हा मात्र निराशाच पदरात पडली. एकरी तीन पोती, तर कुठे चार पोती झाली आणि शेतकरी पुरता हबकून गेला. आजच्या सद्यस्थितीला तरी शेतकऱ्याच्या नशिबी अठरा विश्व दारिद्र्य आहे असेच म्हणावे लागेल.