कुरंगीच्या सोनटेक शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथून जवळच असलेल्या कुरंगी गावच्या सोनटेक येथे शेतात काम करत असलेल्या शेतमजूरावर आज सकाळी साडे अकराच्या सुमारास बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. परंतु हल्ला होताच शेतमजूराने जोरजोराने आवाज दिल्यावर आसपासच्या शेतकऱ्यांनी बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी आरोळ्या मारल्याने तसेच शेतमजूराने घाबरून न जाता बिबट्याच्या हल्ल्याचा प्रतिकार केल्यामुळे या हल्ल्यात शेतमजूर बचावला. मात्र यावेळी तो जबर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा नगरपरिषदेच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजेश बापू लोहार (२६) हा मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतो. दररोज प्रमाणे आजही राजेश लोहार हा दोन मित्रांसोबत नागराज तारांचंद पाटील यांच्या शेतात कामाला गेलेला होता. शेतात काम करत असतांनाच सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास राजेशवर बिबट्याने अचानकपणे हल्ला चढवला, हल्ला होताच राजेश याने बिबट्याचा प्रतिकार करत जोरजोरात आरोळ्या मारल्याने जवळच असलेल्या मित्रांनी बिबट्याला पळवून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. यात बिबट्याने घाबरुन पळ काढला मात्र बिबट्याच्या हल्ल्यात राजेश लोहार यांच्या दोघ हातावर व शरिरावर जखमा झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.