जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगावात शिवसेनेचे माजी महापौर ललित फार्म हाऊसवर सुरू बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली असून माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट कॉल सेंटर प्रकरणात एकूण दहा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आठ जणांना अटक झाली आहे तर इतर तीन मुख्य सूत्रधार फरार आहेत.
जळगाव बोगस कॉल प्रकरणात गेल्या नऊ दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या माजी महापौर ललित कोल्हे यांना आज जळगाव जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका कॅनडा सह इतर देशांमधील विदेशी नागरिकांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली असून फसवणूक झालेल्या विदेशी नागरिकांशी पोलिस आता संपर्क साधणार आहेत.
या प्रकरणात फरार असलेले तीन आरोपी विदेशात पसार होऊ नयेत म्हणून या फरार तीन मुख्य सूत्रधारांविरुद्ध देशातील सर्व विमानतळावर लूकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. या प्रकरणात विदेशातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपवण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिस कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट
माजी महापौर ललित कोल्हे यांना पोलिस कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला जात आहे. पोलिस तपासामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र, ज्या पोलिस कोठडीत ललित कोल्हे यांना ठेवण्यात आले, त्या पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी बदली केली आहे. आरोपींना या प्रकरणात कसलीही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली नसून पोलिस ठाण्याच्या हद्दीत बनावट कॉल सेंटर सुरू असताना पोलिस निरीक्षकांचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची बदली केल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.