
लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यात मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची आहे. या निवडणुकीकडे सगळ्या देशाच लक्ष लागलेलं आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे, हे एकमेव कारण नाहीय, यंदाची निवडणूक एकप्रकारे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे.
उद्धव ठाकरे गटातून मागच्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झालं आहे. त्यामुळे जनाधार टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने मनसे आणि उद्धव ठाकरे गट या दोघांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. असे असतांना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? ही चर्चा रंगली आहे. दोन्ही बाजूंकडून युती होण्याचे संकेत मिळत आहेत. वरिष्ठ स्तरावर मनसे आणि उद्धव ठाकरे गटात काय बोलणी झालीय? ते माहित नाहीय. पण खालच्या पातळीवर कार्यकर्त्यांच मनोमिलन सुरु झालं आहे. सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत दोन्ही पक्षांनी एकत्र येणं ही गरज बनली आहे. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
दोन्ही ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु असताना आज मुंबईत एक मोठी घडामोड घडतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वांद्रयाच्या ताज ताज लॅंड एन्ड हॉटेलमध्ये भेट झाली आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे. भेटीमुळे महाराष्ट्रात वेगळं समीकरण तयार होणार का? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. मागील तासभरापासून राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दैनंदिन कार्यक्रमात राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा कोणताही उल्लेख नव्हता. दोन्ही नेत्यांमध्ये अचानक वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीत कशावर आणि काय चर्चा झाली? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या भेटीवर सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
‘कुणीही कुणालाही भेटू शकतो.. या भेटीत वावगं काय आहे.. काहीही झाले तरीही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतीलच.. ‘
अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
रोहित पवार म्हणाले…
राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वातावरण निर्माण झालेले असताना राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘राज ठाकरे – उद्धव ठाकरे एकत्र येतील, असं वातावरण निर्माण झालं होतं तेव्हा, सर्वसामान्य माणसाच्या मनातसुद्धा आत्मीयतेची भावना निर्माण झाली होती. मात्र, अशा भावनिक क्षणी राज ठाकरे यांची फडणवीसांसोबतची भेट उघड होताच, एक नैसर्गिक प्रश्न उभा राहतो, या वातावरणाचा उपयोग करून मनसेने भाजपसोबत वाटाघाटी केली का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडेल, असे रोहित पवार म्हणाले.
राजकारणात काहीही होऊ शकते. राज साहेबांना पहिल्यांदा आम्ही ऑफर दिली होती, आजही ती ओपन आहे. त्यांच्या मागे असलेला मास, त्यांचे वक्तृत्व हे पाहिलं तर राज ठाकरे हे चांगल्या पद्धतीने महापालिकेची निवडणूक लढवू शकतात. उबाठा गटाची भूमिका काय आहे हे मलाच कळत नाही. ते उद्या एमआयएम बरोबरही जातील, आणखी कोणा बरोबर जातील. शरद पवारांची राष्ट्रवादी आज त्यांच्यासोबत नाही. म्हणून लढाई कशी लढायची असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.
संजय शिरसाट

