लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला पार पडली. २३ नोव्हेंबरला मतमोजणी झाली. महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले. महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. १३२ जागा भाजपला मिळाल्या, ५७ जागा शिंदे यांच्या शिवसेनेला आणि ४१ जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्यामुळे विरोधी पक्ष नावालाच शिल्लक आहे. एकूण जागांच्या एक दशांश जागा सुद्धा महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाला मिळाल्या नसल्यामुळे विरोधी पक्ष नेत्याविना आता विधानसभा राहणार आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुती आता ‘हम करे सो कायदा’ या न्यायाने वागील यात शंका नाही. त्याची झलक सरकार स्थापन करण्यात दिसून आली. २६ नोव्हेंबर २०२४ ला विधानसभेची मुदत संपली असली, तरी सरकार स्थापन झाले नाही. असे असतांना राष्ट्रपती राजवट लागू न होता बेभरोसे राज्यकारभार चालू आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात अधिकाऱ्यांचे राज्य चालू आहे.
प्रचंड बहुमत मिळाले असले तरी अद्याप मुख्यमंत्री निवडीचाच घोळ चालू आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या सातारा जिल्ह्यातील दरेगावात जाऊन एकांतात बसले. स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळत नाही, तसेच आपल्याला हवे ते गृहखाते सुद्धा मिळत नसल्याने ते नाराज आहेत. भाजपवर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न फसलेला आहे. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी जाहीर पाठिंबा दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या बार्गेनिंग पॉवरची हवा काढून घेतली आहे. वास्तविक एकनाथ शिंदे यांनी मुंबई सोडून कोठे जायला नको होते. परंतु दरेगाव या खेड्यात जाऊन ते बसले होते. तिथे फोनचे नेटवर्क सुद्धा नाही. गृहखाते शिंदे यांना मिळालेले नाही तर ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत. उपमुख्यमंत्रीपद ते स्वतःच्या पक्षातील विश्वासू सहकाऱ्याला सोपवतील असे दिसते.
आता तर स्वतःचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देतील असा दावा केला जातो आहे. स्वतः शिंदे पक्षप्रमुख म्हणून राहतील आणि आपला पक्ष वाढवण्याचे काम करतील असे दिसते. एकनाथ शिंदे कदाचित महायुतीत न राहता ते बाहेरून पाठिंबा देतील, असेही बोलले जात आहे. एकंदरीत एवढे प्रचंड बहुमत मिळाले असताना सरकार स्थापनेचा जो घोळ चालू आहे, त्यावरून सरकारची आगामी वाटचाल कशी राहील हे दिसून येत आहे. महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमतावर जनतेचा विश्वास बसत नाही. निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर आणि त्यांना मिळालेली ईव्हीएम मशीनची साथ याचा हा विजय आहे. राज्यातील किमान १०० जिंकणारे उमेदवार ईव्हीएम मशीनचे बळी ठरल्याने जिंकणारे उमेदवार ईव्हीएम मुळे हरले असे दावे प्रति दावे केले जात आहेत.
निवडणूक मतदानाच्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत जे मतदान झाले त्यातच खरे गौड बंगाल आहे, असा अनेक जणांकडून पुराव्यानिशी दावा केला जातो आहे. राज्यभरात ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याबाबत सर्वत्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात जनता आहे. मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७ % मतदान झाल्याचे आयोगाने जाहीर केले. याचा अर्थ रात्री उशिरापर्यंतचे झालेले मतदान एकूण ६५.५ % इतके टक्केवारी आयोगाने जाहीर केली. म्हणजे साडेआठ टक्के मतदान पाच वर्षानंतर झाले. याचा अर्थ एकूण ७० ते ७५ लाख इतके मतदान पाच वाजेनंतर झाले, यावर विश्वास बसत नाही. जळगाव जिल्ह्यात पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत मतदान झाले. चोपडा विधानसभा मतदारसंघात तसेच मुक्ताईनगर विधानसभा, पारोळा एरंडोल विधानसभा तसेच जळगाव ग्रामीण सह जळगाव शहर आणि रावेर विधानसभा मतदारसंघातील जिंकण्याच्या वाटेवर असलेल्या उमेदवारांचा प्रचंड मताधिक्याने झालेला पराभव, त्यांचे विश्लेषण आणि चिकित्सा करायची झाली तर पाच वाजेनंतर मतदानाच्या दिवशी लक्ष्मी दर्शनाची ही कमाल असल्याचा जो आरोप होतो आहे, त्यात तत्यांश नाही असे म्हणता येणार नाही. त्यातच ईव्हीएम मशीनच्या मिळालेल्या साथीमुळे अनेक उमेदवारांचे मोठा मताधिक्याने लॉटरी लागली.
जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संकट मोचक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे आतापर्यंत मिळालेल्या मतांपेक्षा जास्तीत जास्त रेकॉर्ड बॅक मताने विजय होतील, असा त्यांनी स्वतः दावा केला होता. परंतु ते अवघ्या २६ हजार ८८५ मताधिक्याने विजयी झाले. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे २३ हजार मताधिक्याने विजयी झाले. चंद्रकांत पाटील आणि रोहिणी खडसे यांच्यात ‘काटे की’ टक्कर झाली होती. तोच प्रकार पाचोरा भडगाव मतदार संघात म्हणता येईल. किशोर पाटलांच्या विषयी देखील असे आहे. अपक्ष उमेदवार अमोल शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्यात फाईट होऊन दोघांपैकी एकाचा विजय होईल आणि किशोर पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहतील असे वातावरण असताना ते ६८ हजार ३८८ च्या मताधिक्याने विजयी होतात आणि चोपडा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रभाकर सोनवणे यांची हवा असताना चंद्रकांत सोनवणे सुद्धा मोठा मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे जिंकणारे उमेदवार ईव्हीएममुळे हरले असा आरोप होतो आहे. परंतु विजय तो विजय.. हे निकाल लागले की लावले गेले? असा होणारा आरोप लोकशाहीला घातक आहे…!