लोकशाही संपादकीय लेख
प्रजासत्ताक दिनाचा सोहळा नाशिक येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी अभिवादन करताना छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, वंदे मातरम आदी घोषणा झाल्या, परंतु अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे गिरीश महाजन विसरले. दरम्यानच्या काळात तेथे ड्युटीवर कवायतसाठी उपस्थित असलेल्या वनकर्मचारी माधवी जाधव यांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिले त्या बाबासाहेबांचं नाव पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात न घेणे म्हणजे हा त्यांच्यावर घोर अपमान आहे. म्हणून त्यांनी तेथील संयोजकांना माईक मागितला तो दिला नाही. तेव्हा माधवी जाधव यांनी बाबासाहेब आंबेडकर की जय हो म्हटलं आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर विविध राजकीय पक्षाच्या लोकांकडून गिरीश महाजन यांच्यावर कुठलाही मागचा पुढचा विचार न करता टिकेची झोड उठवली. आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात अनेक जणांना पोलिसांनी अटक केली. काही कार्यकर्ते वन कर्मचारी माधवी जाधव हिचे कौतुक करीत होते. ड्युटीवरील वर्दी अंगावर असताना तिने कसलाही मागचा पुढचा विचार न करता गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल नाही झाला तर या क्षणापासून मी उपोषणाला बसेल असे सांगितले. आमच्या राजकीय नेत्यांना एवढे कारण पुरेसे आहे. जो उठतो तो गिरीश महाजन यांना एकेरी शब्दात उल्लेख करीत बोलतो. आमच्या राज्याची हीच का संस्कृती आहे? बहुतेक जण तर कार्यक्रमात घडले आहे का? याची माहिती न घेताच बोलत सुटले. भाजपची ही जातीयवादी पिलावळ असून त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुसून काढायचे आहे. त्यातीलच एक म्हणजे गिरीश महाजन यांचे मुखातून बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेणे हे होय. माधवी जाधव या नोकरदार महिलेचे आम्ही कौतुक करत आहोत, की त्यांनी आपल्या नोकरीची परवा न करता तिने छातीठोकपणे पालकमंत्री गिरीश महाजन यांची विरोधात आवाज उठवला. आमची सगळी ताकद माधवी जाधव यांच्या पाठीशी उभी करून देऊ तिच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही बघून घेऊ. एक ना अनेक जण आंबेडकर चळवळीचे नेते म्हणून गिरीश महाजन यांच्या विरोधात तुटून पडले. माधवी जाधव राहिल्या बाजूला परंतु त्या व्यतिरिक्त इतर मंडळी ज्या वेशाने बोलायला लागले आहेत.. बरे काँग्रेस नेते वडेट्टीवार सुद्धा आपले हात धुवून घेतले. ते म्हणाले की बाबासाहेबांचं नाव घ्यायला जणू त्यांना लाज वाटावी.. बाबासाहेबांचं नाव पुसून काढण्याचा त्यांचा एकमेव अजेंडा आहे.
या सर्व परिस्थितीत गिरीश महाजन म्हणाले की, बाबासाहेबांचं नाव न घेणे हे अनावधानाने राहून गेले असेल. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. असे सांगून ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर बाबासाहेबांच्या कार्यक्रमाला लोक येतात आणि त्यांना नमस्कार करून ते जातात. परंतु माझ्या जामनेर गावात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी जो कार्यक्रम होतो त्या ठिकाणी ट्रॅक्टर वर मिरवणूक काढून लेझीम खेळून इतर कार्यक्रम करणे आधी 12 ते 13 तास जो कार्यक्रम होतो, तो संपूर्ण कार्यक्रम मी शेवटपर्यंत हजर असतो. तेही निळे कपडे घालून कार्यक्रम करतो. एकट्या जामनेर गावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्या इतकाच उभा बाबासाहेबांचा पुतळा मी उभारला आहे. ते बाबासाहेबांवर असलेल्या प्रेमामुळे. त्यामुळे बाबासाहेबांवर प्रेम नाही असे म्हणणे हे बरोबर नाही. केवळ अनावधानाने माझे तोंडून नाव घेणं राहिले, हे ही मी कबूल करतो. एवढी जाहीररित्या माफी मागितल्यावर आता त्यांच्यावर टीका करीत राहत आहे, याला काय म्हणावे? ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा म्हणून एक आग्रह धरणे कितपत योग्य आहे? त्यांच्या जामनेर मधील आंबेडकर चळवळीतील मंडळी म्हणतात, की गिरीश महाजन यांना आम्ही लहानपणापासून ओळखतो. ते आमच्या मोहिल्यात येऊन आमच्या सुखदुःखात सहभागी होतात. इतकेच नव्हते तर आमच्या सणवारात ते सामील होतात. अन नावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे राहिले असेल तरी त्यांनी त्याबाबत माफी मागितली आहे. गिरीश महाजन हे जातीयवादी मुळीच नाहीत. त्यांच्या जामनेर गावातील ही मंडळी त्यांची बाजू घेतात तेव्हा राजकारण करीत बसण्यापेक्षा किंवा या गोष्टीला राजकारणाचा रंग देण्यापेक्षा त्यावर पडदा टाकलेला बरा..!

