लोकशाही न्यूज नेटवर्क

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यावरून देशात सुरू असलेल्या चर्चेला आता राजकीय रंग मिळताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील रीवा येथील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. त्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “शुद्ध पेट्रोल कुठून येणार? तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का?” असा सवाल त्यांनी जाहीर कार्यक्रमात केला.
रीवा विमानतळावर रविवारी दोन नव्या हवाई सेवांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री, आमदार तसेच अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. याच कार्यक्रमात भाषण करताना जनार्दन मिश्रा यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन केले.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याला काही जण विरोध करत असून, त्याऐवजी शुद्ध पेट्रोलची मागणी केली जात असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी आक्रमक भाषेत म्हटले, “ इथेनॉल चालणार नाही यावर आंदोलन होत आहे, शुद्ध पेट्रोल चालेल. शुद्ध पेट्रोल कुठून येणार? तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का? देशात शुद्ध पेट्रोल आहेच कुठे, मग ते कुठून आणणार?”
त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील वरिष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच हे वक्तव्य करण्यात आल्याने त्याची अधिक चर्चा होत आहे. जनार्दन मिश्रा यांची वक्तव्ये यापूर्वीही चर्चेत राहिली आहेत. त्यांच्या आक्रमक आणि काही वेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते अनेकदा चर्चेत आले आहेत.
इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाचे समर्थन करताना मिश्रा यांनी भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीचाही मुद्दा उपस्थित केला. भारतात देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन मर्यादित असून, मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल परदेशातून आयात करावे लागते, असा दावा त्यांनी केला.


