एरंडोल पारोळ्यात तणाव : डॉ. सतीश पाटलांवर गुन्हा दाखल
कडकडीत बंदसह ठिय्या आंदोलन : सतीश पाटलांचा खुलासा
पारोळा/एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळ्यात अपेक्षाहार्य पोस्टमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सुदैवाने पोलीसांनी सतर्कता दाखवत परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. सोशल मीडियावर माळी समाजा बाबत आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याबद्दल माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचे विरूद्ध एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासोदा येथील नवाज सय्यद या अल्पवयीन मुलाने डॉ. सतीश पाटील यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्यामुळे समस्त माळी समाज बांधवांमध्ये संत्तप्त भावना व्यक्त करण्यात येत असून या घटनेचा सर्वत्र जाहीर निषेध करत माळी समाज बांधवांतर्फे एरंडोलात २२ नोव्हेंबर रोजी सकाळी निषेध मोर्चा काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. सतीश पाटील यांच्या प्रतिमात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी एरंडोल येथील मुस्लिम समाज बांधवांतर्फे सुध्दा घटनेचा निषेध व्यक्त करीत संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.
याचा परिणाम सकाळी बाजारपेठेवर दिसुन आला. सकाळी अनेक व्यापारी आपआपली दुकाने उघडण्यासाठी बाजारपेठेत आले असता त्यांना भाजीपाला मार्केट बंद असल्याचे सांगण्यात आले. यामुळे संभ्रम निर्माण झाला व अनेकांनी दुकाने न उघडताच मागारी फिरले. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. म्हणून काही काळ पारोळा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु काही वेळाने पोलीस प्रशासनाने बाजारपेठेत फिरून आपल्या वाहनावरील लाऊड स्पीकर वरून दुकानदारना आवाहन केले कि कोणत्याही अफवांना बळी पडु नका आप आपली दुकाने सुरू करण्याचे आवाहन केले दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.
माळी समाज बांधवानी घटनेबाबत आक्रमक पवित्रा घेत एरंडोल शहरातून मोठ्या संख्येने एकत्र येऊन जाहीर निषेध मोर्चा काढत पोलीस स्टेशनला नेला. यावेळी जवळपास बराच वेळ मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते व संबंधितांवर गुन्हा दाखल करा. अशी जोरदार मागणी करीत होते. अखेर जळगावचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक आल्यावर या प्रकरणी माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचे विरूद्ध फिर्यादी जितेंद्र अशोक महाजन रा. महात्मा फुले पुतळ्याजवळ, एरंडोल यांनी फिर्याद दिल्यावरून भारतीय न्याय संहिता कलम १७३ अंतर्गत २०२३ ३५३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश पाटील यांनी केला खुलासा
माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे खुलासा केला की, चुकीच्या पोस्टमुळे कोणताही संभ्रम निर्माण करू नये. माझे इंस्टाग्राम निवडणूकी निमित्ताने एका एजन्सीला देण्यात आले होते. त्यावरून एक पोस्ट केले गेले होते. परंतु या पोस्टमध्ये संबंधित कोणी तरी फेरफार करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
पोलिस प्रशासनाची सतर्कता
एका चुकीच्या पोस्टमुळे पारोळ्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सुदैवाने पोलीसांनी सतर्कता दाखवत परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीस प्रशासनाच्या वतीने सकाळीच पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी एसआरपीच्या तुकडी सह शहरात ठिकठिकाणी फिरत तसेच पोलीस वाहनाच्या लाऊड स्पीकर वरून दुकानदारना आवाहन केले की, कोणत्याही अफवांना बळी पडु नका. आपआपली दुकाने सुरू करण्याचे आवाहन केले काही वेळातच बाजारपेठेतील दुकाने सुरू झाली व सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.
भाजीपाला मार्केट बंदच
चुकीच्या पोस्टमुळे शहरातील भाजीपाला मार्केटला मात्र फटका बसला. शहरातील भाजीपाला मार्केट हे सकाळीच सुरू होते. परंतु चुकीच्या पोस्ट मुळे शहरातील भाजीपाला मार्केट मधील अनेक व्यापार्यांनी लिलाव न करण्याचा निर्णय घेतल्याने येथील भाजीपाला मार्केट तसेच किरकोळ विक्रेते यांनी आप आपली दुकाने बंद ठेवली होती.