प्रसुत कन्येचा डबा घेऊन जाणाऱ्या पित्याचा अपघातात मृत्यू

0

 एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील ग्रामीण रुग्णालयात प्रस्तुती झालेल्या कन्येचा डबा घेऊन भालगाव येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाने एरंडोलकडे पायी येत असताना सुनील भास्कर शिंदे (वय ४४) यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. ही घटना १७ जुलै २२ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास धारागीर गावानजीक  घडली. विशेष हे की सुनील शिंदे याला उडवल्यानंतर अज्ञात वाहनाने अपघाताची खबर न देता पलायन केले.

एरंडोल तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी सुनील भास्कर शिंदे यांच्या मुलीची एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्रसुती झाली. त्यानंतर सुनील हे भालगाव येथून डबा घेऊन पायी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाने एरंडोलकडे निघाले. वाटेत धारागीर गावाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना उडवले. त्यात ते जागीच गतप्राण झालं. या दुर्घटनेचे वृत्त भालगावला समजल्यावर हळहळ व्यक्त करण्यात आली.  सुनील हा शेतमजूर असून त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. घरची परिस्थिती हालाखीची असून कुटुंबप्रमुख सुनील शिंदे याचे अपघाती निधन झाले. त्यामुळे त्याचा परिवार निराधार झाला आहे.

या अपघाताबाबत माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार विकास देशमुख पंकज पाटील, अनिल पाटील, वाल्मीक ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली व छिन्नविछिन्न अवस्थेत असलेला सुनील यांचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. नेमक्या त्याच ठिकाणी मृताची कन्या प्रसुतीसाठी दाखल झाली होती.  याबाबत तिला माहिती मिळाल्यावर तिने एकच हंबर्डा फोडला. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.