जनावरांची कत्तल केलेले १५ किलो मांस आढळले
महादेव मंदिरालगतच कत्तलखाना, अंजनी नदीत सोडले जाते रक्ताचे पाणी
एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अंजनी नदीच्या काठी असलेल्या जुन्या कत्तलखान्यात गोवंश व म्हैस जातीचे जनावरांचे कत्तल केलेले अदमासे १५ किलो मांस, अवशेष, शिंगे मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अवैधरित्या गोवंश व म्हैस जातीचे जनावरांचे कत्तल करून अंदाजे १५ किलो मांस अवशेष शिंगे जागेवर सोडून दिले. दरम्यान सदर कत्तलखाना आठवडे बाजारातील महादेव मंदिरालगत असून तो बेकायदेशीर आहे म्हणून सदर कत्तलखाना तात्काळ उध्वस्त करावा अशी मागणी समस्त हिंदू समाज बांधवांतर्फे पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी, नगरपरिषद यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून बेकायदेशीर कत्तलखाना नियमित सुरू असून परिसरातील रहिवाशांनी वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रारी देखील केले आहेत. परंतु कोणतीही कारवाई या कत्तलखान्यावर अद्याप पर्यंत झालेली दिसून येत नाही असे निवेदनात नमूद केले आहे. विशेष म्हणजे अंजनी नदीच्या काठी हा कत्तलखाना असल्याने कत्तलखान्यातील गोवंशाचे रक्ताचे दूषित पाणी अंजनी नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. असे निवेदनात म्हटले आहे.