एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क
परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जमीनीत बऱ्यापैकी ओल असल्याने तालुक्यात कोरडवाहू हरभरा पेरणीच्या कामाला वेग आला आहे. एका बाजूला हरभरा पेरणी काम जोरात सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला कापूस वेचणी, ज्वारी, मका, सोयाबीन कापणी ही खरीपाची कामे सुरू आहेत.
कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. बिघ्याला दोन ते अडीच क्विंटल कापसाचे उत्पादन आल्याची माहिती शेतकरी बालू पाटील यांनी दिली आहे. कापसाचे उत्पादन कमी व त्यात जर भावही कमी मिळाला तर शेतकऱ्याने जीवन कसे जगावे?. एखाद्या वर्षी शेतजमीनीत पेरण्या न करण्याचा असा संप जर शेतकऱ्यांनी केला तर केवढे मोठे संकट कोसळणार आहे.
याबाबत विचार होणे गरजेचे आहे. संकटे व समस्या यांना फक्त शेतकऱ्यांनीच तोंड द्यावे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी हा म्हणायला राजा पण प्रत्यक्षात तो देशोधडीला लागला आहे.