१३ वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरून निर्घृण हत्या; नरबळीचा संशय, रिंगणगाव हादरलं

0

१३ वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरून निर्घृण हत्या; नरबळीचा संशय, रिंगणगाव हादरलं

एरंडोल (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा खळबळीत खुनाने हादरवून टाकले आहे. एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे १३ वर्षीय बालकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला. तेजस गजानन महाजन (वय १३) असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या हत्येमागे नरबळीचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

दुकान बंद केल्यानंतर गायब; रात्रभर शोध सुरू

तेजस हा आपल्या आई-वडील व बहिणीसह रिंगणगाव येथे राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन हे शेतीकामासोबतच कृषी केंद्र चालवतात. सोमवारी (दि. १६ जून) त्यांनी तेजसला दुकानावर ठेवून कामानिमित्त जळगावला प्रस्थान केले होते. संध्याकाळी दुकान बंद करून तेजस घरी परतेल, अशी अपेक्षा होती. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी एकत्र येत रात्रभर शोध घेतला. दरम्यान, एरंडोल पोलिसांत तक्रार दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

खर्ची शिवारात निंबाळकरांच्या शेतात आढळला मृतदेह

मंगळवारी पहाटे खर्ची गावाजवळील निंबाळकर यांच्या शेतात एका मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक व फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नरबळीच्या दिशेने तपास; तिघे संशयित ताब्यात

या घटनेमागे अंधश्रद्धेच्या पार्श्वभूमीवर नरबळीचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. बालकाची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे व कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.

या खुनामुळे जळगाव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच संपूर्ण तथ्य समोर येण्याची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.