ट्रकला व्हॅगनारची धडक; एक जागीच ठार, दोन गंभीर जखमी

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथून जळगावकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या शिवानंद ढाब्यावर थांबलेल्या ट्रकला मागून व्हॅगनारने धडक दिली. त्यात चंद्रकांत नामदेव पाटील (वय ४५, रा. नगाव, धुळे) हे जागीच ठार झाले तर त्यांचे साथीदार अशोक तोरवणे (वय ४८) व सतीश हेमचंद्र चौधरी (वय ४७) दोघे राहणार शिंदखेडा हे गंभीर जखमी झाले.  ही दुर्घटना सोमवारी ६ जून २०२२ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सीजी ०४ जेडी ०२८२ क्रमांकाचा ट्रक दुपारपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या शिवानंद धाब्यावर थांबला होता. या उभ्या ट्रकला एम एच २० सी एस १३८४ क्रमांकाच्या मारुती कारने जोरदार धडक दिल्याने कारमधील चंद्रकांत नामदेव पाटील हे जागीच गतप्राण झाले तर अशोक तोरवणे व सतीश चौधरी हे गंभीर जखमी झाले.

त्यावेळी माजी जि.प. सदस्य नाना भाऊ महाजन, रवींद्र चौधरी, प्रमोद महाजन हे पिंपरी प्रचा येथे लग्नाला हजेरी लावून एरंडोलकडे परत येत असताना त्यांना अपघात झाल्याचे कळताच त्यांनी पोलीस स्टेशनला व ग्रामीण रुग्णालयाला भ्रमणध्वनीवरून संपर्क केला व घटनेची माहिती दिली. पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी नाना भाऊ महाजन व त्यांच्या सोबत असलेल्या शिवसैनिकांनी मदत कार्य केले. खाजगी गाडीने अपघातातील ठार झालेल्या व्यक्तीचा मृतदेह आणि दोघे गंभीर जखमी व्यक्तींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी गंभीर जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना जळगाव येथे पाठवण्यात आले.

या अपघातात चालकाजवळ पुढे बसलेला इसम जागीच ठार झाला. कारमधील तिघेजण जळगाव येथे लग्नासाठी गेले होते. लग्नाला हजेरी लावल्यानंतर ते धुळ्याकडे घरी परत जात असताना वाटेवर एरंडोल नजीक क्रूर काळाने अपघाताच्या निमित्ताने त्यांच्यावर झडप घातली. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल अनिल पाटील, पंकज पाटील, राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.